धुळे : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले बाहेर | पुढारी

धुळे : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले बाहेर

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा ; साक्री तालुक्यातील मैंदाणे, धवळीविहीर, झंझाळे, बोधगाव, रोहन आदी गावांत ग्रामस्थांना सळो की पळो करून सोडणारा बिबट्या मंगळवारी रात्री धवळीविहीर, झंझाळे रस्त्यावरील कठडा नसलेल्या विहिरीत पडला. बिबट्याला पाहण्यासाठी आज सकाळी विहिरीजवळ बघ्यांची एकच गर्दी जमली. याबाबत वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे पथक पिंजऱ्यासह दाखल झाले. दुपारी बाराच्या सुमारास क्रेनद्वारे विहिरीत पिंजरा सोडल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि वन विभागाच्या अधिका-यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

साक्री तालुक्यातील मैंदाणे, ढवळीविहीरसह परिसरातील गावांमध्ये तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून दोन बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे. दिवसाढवळ्याही हे बिबटे शेतशिवारात दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची दहशत आहे. गेल्या २५ मार्चला बिबट्याने मैंदाणे येथील करमसिंह बालू वंजारी यांच्या शेतातील वासरीचा, तर दोन एप्रिलला रात्री एकच्या सुमारास रमय्यासिंग मागट्या वंजारी यांच्या शेतातील वासराचा फडशा पाडला होता. यानंतर तीन एप्रिलला पुमहा करमसिंह वंजारी यांच्या शेतातील आणखी एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला होता. सतत शिकारीच्या शोधात फिरणाऱ्या या बिबट्यांमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.

यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मैंदाणे येथील सरपंच, पंचायत समितीच्या सदस्या संगीता गणेश गावित यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, पिंपळनेरचे अपर तहसीलदार विनायक थविल, वन क्षेत्रपाल अरुण माळके, दहिवेल येथील वनक्षेत्रपालांना निवेदनही दिले होते. निवेदन दिल्यानंतरही काहीच कार्यवाही होत नसतानाच मंगळवारी रात्री मैंदाणे येथे पुन्हा बिबट्याने ग्रामस्थांना दर्शन दिले. यामुळे काही ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करत हुसकावून लावले. तेथून हा बिबट्या धवळीविहीर, झंझाळे रस्त्याने जात असतानाच समोरून वाहन आले. त्याच्या प्रकाशझोतामुळे बिथरलेला बिबट्या पळू लागला आणि रस्त्यालगत असलेल्या रमेश पवार यांच्या शेतशिवारातील बिनकठड्याच्या विहिरीत बिबट्या पडला. आज सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी विहिरीकडे धाव घेतली विहिरीत फारसे पाणी नसल्याने बिबट्या जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुपारी बाराच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात…

दरम्यान, धवळीविहीरचे पोलिसपाटील कन्हय्या पवार, झंझाळेचे पोलिसपाटील राजू गांगुर्डे, गणेश गावित, संगिता गावित आदींनी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, कोंडाईबारीचे वनक्षेत्रपाल पि. बी.पाटील, पिंपळनेरचे वनक्षेत्रपाल अरुण माळके यांना घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी अधिकाऱ्यांसह वन विभागाचे कर्मचारी पिंजरा व वाहनासह धवळीविहीरला पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे मदतकार्य सुरू करण्यात आले. यानंतर दुपारी बाराच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि तो जेरबंद झाला.

क्रेनद्वारे पिंजरा विहिरीबाहेर काढण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाच्या पथकाला सहकार्य केले. दोनपैकी एक बिबट्या जेरबंद होणार असला, तरी दुसऱ्या बिबट्याचाही बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, पकडलेला बिबट्या लळींग येथील वनक्षेत्रात सोडण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button