नाशिक : ज्ञानेश्वर वाघ
नाशिक शहरातील 'दुबई' वॉर्ड म्हणून जुने नाशिक भागातील प्रभाग क्र. 20 कडे पाहिले जाते. दुबई वॉर्ड अशी ओळख असली तरी स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्या शहरातील या भागाकडे पाहिले तर हा नाशिक शहराचाच भाग का? अशी शंका यावी, या प्रकारे या प्रभागाची दुरवस्था आहे. यामुळे या प्रभागाचा विकास करण्यासाठी या भागातील नागरिक यावेळी कुणाला पसंती देतात याकडे लक्ष लागून आहे.
प्रभाग क्र. 20 हा मुस्लीम बहुल परिसर आहे. यामुळे साहजिकच या भागात सर्वाधिक मतदारसंख्या ही मुस्लीम समाजाची आणि त्या खालोखाल इतर समाजाचे मतदार आहेत. नाशिक शहराचे प्रमुख द्वारांपैकी एक असलेल्या द्वारका भाग या प्रभागाला जोडला जातो. यामुळे खरे तर नाशिक शहराची ओळख सांगणारा प्रभाग असला तरी वर्षानुवर्षे या परिसराच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवलेली आहे. यामुळे या ठिकाणी उघड्या गटारी, चिंचोळे रस्ते आणि त्यामुळे नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, कमी दाबाने मिळणारे पिण्याचे पाणी अशा समस्या नेहमीच्याच झालेल्या आहेत.
प्रभागात अनेक झोपडपट्ट्या असल्याने त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा मनपाच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात पुरवलेल्या नसल्याने अनेक ठिकाणाला बकाल स्वरूप प्राप्त झालेले आहे. अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट निर्माण झाल्याने स्वच्छता नावाचा प्रकार दिसून येत नाही. यामुळे या सर्व समस्या पाहिल्या तर लोकप्रतिनिधींचेच हे अपयश मानायला हरकत नाही. वर्षानुवर्षे या ठिकाणाहून निवडून येणारे नगरसेवक एकदा का निवडून गेले की पुन्हा प्रभागाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. यामुळेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागातील नागरिक कुणाला पसंती देतात याकडे लक्ष लागून आहे.
तीनसदस्यीय असलेल्या या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या 4,597 इतकी आहे. यामुळे या प्रभागात एक सीट एससीसाठी राखीव असेल. या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक आहेत. प्रभागात विद्यमान दोन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस, एक नगरसेवक काँग्रेसकडून तर एक नगरसेवक अपक्ष निवडून आलेला आहे. मुस्लीम बहुल प्रभाग असल्याने या ठिकाणाहून बहुतांश सर्वच राजकीय पक्षांकडून याच समाजाच्या उमेदवारांना पसंती दिली जाते. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना या मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने फारसे यश पदरात पडत नाही.
असा आहे प्रभाग
मोठा राजवाडा, नानावली, चौक मंडई, मुलतानपुरा, वोक्हार्ट हॉस्पिटल, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, ट्रॅक्टर हाऊस, कन्नमवार पूल, मदिना चौक, सारडा सर्कल, गंजमाळ पोलिस चौकी, वाकडी बारव, चव्हाटा देवी चौक, शिवाजी
इच्छुक उमेदवार
माजी नगरसेविका रंजना पवार, राष्ट्रवादीच्या नगरसेविका शोभा साबळे, समीना मेमन, काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, तसेच शरद काळे, ज्ञानेश्वर पवार, मुजाहिद शेख, नगरसेवक सुफी जीन, संजय साबळे आदी इच्छुक आहेत.