पणजीकरांचा पुन्हा बाबूशवर विश्वास, उत्पल पर्रीकर पराभूत | पुढारी

पणजीकरांचा पुन्हा बाबूशवर विश्वास, उत्पल पर्रीकर पराभूत

पणजी पुढारी वृत्तसेवा: आठव्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पणजी मतदारसंघात भाजपविरुद्ध अपक्ष अशी लढत होती. त्यात भाजपकडून आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यापुढे अपक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांचे आव्हान होते. त्यात मोन्सेरात यांनी 716 अशा निसटत्या मतांनी विजय मिळविला.

पहिल्या फेरीत मोन्सेरात दोनशे 342 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी थोडी-थोडी वाढत सातशे मतांच्या पार पोहोचली. मतांची आघाडी थोडी-थोडी वाढत असल्याचे दिसताच उत्पल पर्रीकर व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्र सोडले. अंतिम फेरीअखेर मोन्सेरात यांनी 6,787 एवढी मते घेतली. तर पर्रीकर यांना 6,071 अशी मते मिळाली. तिसर्‍या क्रमांकाची मते काँग्रेसच्या एल्विस गोम्स यांना 3,175 एवढी मिळाली. आम आदमी पक्षाच्या वाल्मिकी नाईक यांना 777 मते मिळाली.

पणजी मतदारसंघात काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलून एल्विस गोम्स यांना रिंगणात उतरविल्याने येथील लढत भाजप विरोधी अपक्ष अशी रंगणार हे स्पष्ट होते. काँग्रेसचे एकगठ्ठा मतदान किमान साडेचार हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे गोम्स यांना पडलेली मते पाहता काँग्रेसमधील बहुतांश मते उत्पल यांच्याकडे वळल्याचे दिसून येते.

त्याशिवाय आम आदमी पक्षाचीही तिच स्थिती झाली. भाजप सोडून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उत्पल यांनी काही आठवड्यांत पणजीतील वातावरण बदलले होते. प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी भाजपच्या गळी उतरली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला भाजपला सदानंद शेट तानावडे यांना बाबूश यांच्या प्रचारासाठी फिरावे लागले होते.

त्याशिवाय स्वतः बाबूश यांनी होम टू होम प्रचार केला. त्याचे मोन्सेरात यांना फळ मिळाल्याचे दिसते. पणजीत बाबूश मोन्सेरात विजयी झाले पण त्यांची मतांची आकडेवारी फारच कमी झाल्याचे दिसून येते. 2019 च्या पोटनिवडणुकीत मोन्सेरात यांनी काँग्रेसच्या तिकिटावर भाजपच्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्यावर 1 हजार 755 मतांनी मात केली होती.

त्यामुळे या निवडणुकीत मोन्सेरात यांच्यापुढे पर्रीकर यांचे पूत्र उत्पल यांनी आव्हान दिल्याने मोन्सेरात यांचे काय होणार, असा सवाल उपस्थित झाला होता.

भाजप केडरच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला उघडपणे विरोध

पणजीत भाजप केडरच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आपल्याला विरोध केल्याचे दिसून आले. पणजीतील नागरिकांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचा आपण आदर करतो. आपल्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते राबले. सातशेच्यावर मतांची आघाडी मिळाली असली तरी ती विजयासाठी महत्त्वाची आहे.

पणजीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपणावर पडली आहे. जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करणार असल्याचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी विजयानंतर सांगितले.

पणजीतील उमेदवारांची मते

  • बाबूश मोन्सेरात (भाजप) 6,787
  • उत्पल पर्रीकर (अपक्ष) 6,071
  • एल्विस गोम्स (काँग्रेस) 3,175
  • वाल्मिकी नाईक (आप) 777
  • राजेश रेडकर (आरजीपी) 359
  • देवेंद्र सुंदरम (40)
  • यशवंत मदार (37)
  • नोटा (173)

Back to top button