नाशिक : शिक्षण विभागाची मलिन झालेली प्रतिमा बदलण्याचे आव्हान : सूरज मांढरे | पुढारी

नाशिक : शिक्षण विभागाची मलिन झालेली प्रतिमा बदलण्याचे आव्हान : सूरज मांढरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण हलका करताना त्यांचे वेतन, आस्थापना व अन्य समस्या कायम सोडविण्यासाठी प्राधान्य असेल, अशी माहिती राज्याचे नूतन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. राज्यात नवीन शिक्षण धोरण प्रभावीपणे राबविताना टीईटीमुळे शिक्षण विभागाची मलिन झालेली प्रतिमा बदलण्याचे आव्हान असेल, असेही त्यांनी सांगितले.

शासनाने सूरज मांढरे यांची शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मांढरे यांनी गुरुवारी (दि.10) नाशिक जिल्हाधिकारी पदाचा पदभार नूतन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी मांढरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न असेल. त्यासाठी शिक्षण विभागात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच राईट टू सर्व्हिस अ‍ॅक्टचा वापर केला जाईल.

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण हलका करण्यासाठी विविध शासकीय विभागांशी चर्चा करणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. त्याच वेळी निवडणुकांच्या कामांमधून शिक्षकांना सवलत देणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा परिषदेत असताना विद्यार्थ्यांसाठी राबविलेले ‘एक पेन, एक वही’ अभियान सध्या राज्यातील 57 तालुक्यांत सुरू आहे. हे अभियान राज्यातील 356 तालुक्यांत सुरू करण्यावर भर असेल, असे मांढरे म्हणाले. तसेच भविष्यात ऑफलाइनसोबतच ऑनलाइन शिक्षणव्यवस्थादेखील सुरू राहणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button