पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद यंदा साताऱ्याला मिळाले आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदा या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या 64व्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेच 4 ते 9 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात खेळवण्यात येईल. कोरोनाच्या प्रादुर्भावात झालेली घट लक्षात घेऊन साताऱ्यासह राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधामध्ये नुकतीच सूट देण्यात आली आहे.