नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या आणि तिसरी लाटही संपुष्टात आल्याने मनपा कोविड केअर सेंटर बंद करणार असून, या ठिकाणचे ऑक्सिजन प्लांट गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषण मुक्तीकरता मनपा एसटीपी प्लांटच्या ठिकाणी उपयोगात आणणार आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने एका प्रकरणात नद्यांमधील सांडपाणी तसेच प्रदूषणाबाबत मनपावर ताशेरे ओढले होते. ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून सांडपाण्यावर ऑक्सिनायझेशनची प्रक्रिया केली जाणार आहे. नवीन बिटको रुग्णालय व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात असलेले ऑक्सिजन प्लांटदेखील काढून मलजलनिस्सारण केंद्रांच्या ठिकाणी उपयोगात आणले जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव आयुक्त कैलास जाधव यांनी सादर करण्याचे आदेश संबंधित खातेप्रमुखांना दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मानकांनुसार या मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ तसेच आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. महापालिकेने रामकुंड व तपोवनात भक्तांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नागपूर येथील ओझोन रिसर्च अॅण्ड अॅप्लिकेशन प्रा. लि. या कंपनीच्या मदतीने दोन ओझोनायझेशन प्लांट उभारण्याची तयारी केली आहे. आता शहरातून प्रवाहित होणार्या 19 किमी लांबीच्या गोदावरी नदीचे पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये उभारलेल्या 22 हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणा-या केंद्रांची (पीएसए प्लांट) मदत घेतली जाणार आहे. ऑक्सिजनच्या माध्यमातून बीओडी अर्थात पाण्यातील ऑक्सिजन पातळी वाढवून पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे.