नाशिक : जि. प. सदस्यांना जाता जाता सेसचा लाभ | पुढारी

नाशिक : जि. प. सदस्यांना जाता जाता सेसचा लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या नियोजनाला गती आली असून, शेवटच्या आठ-दहा दिवसांमध्ये सदस्यांना जाता जाता सेसमधून सहा ते पावणेदहा लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या सेसमधून इमारत व दळवणवळण विभागाला 8 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यातून मुदत संपण्याच्या आत कामे पूर्ण व्हावीत यासाठी सदस्यांकडून डिसेंबरपासून तगादा सुरू होता. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे या निधीचे नियोजन होण्यात उशीर झाला. त्याचे प्रतिबिंब मागील मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत उमटले होते. सभेनंतर आठ दिवसांनी अध्यक्षांनी स्वनिधीतून सदस्यांना कामांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे पाच लाखांपासून ते पावणेदहा लाखांपर्यंत सदस्यांना सेसमधील कामांसाठी निधी दिला जात असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आता सदस्यांचा कालावधी दहा दिवसांचा उरला असून, सदस्यांना आता प्रशासकीय मान्यता, काम वाटप समितीमधून कामे वाटप होऊन शिफारशी मिळवणे, कार्यारंभ आदेश मिळवून कामे पूर्ण करून त्यांची देयके काढणे ही कामे सदस्यांना 31 मार्चच्या आत करावी लागणार आहे. कामे वाटप समितीची बैठक 14 मार्चला होणार असून, त्यानंतर 20 मार्चपर्यंत सदस्यांना ही कामे उरकण्याची घाई करावी लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button