नाशिक : महापालिका 682 बस पिकअप शेडवर उभारणार फूड स्टॉल | पुढारी

नाशिक : महापालिका 682 बस पिकअप शेडवर उभारणार फूड स्टॉल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; महापालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवेत निर्माण होणारा तोटा भरून काढण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ 682 बस पिकअप शेडच्या ठिकाणी फूड स्टॉल उभारणार आहेत. त्यासाठी महापालिकेने खासगी संस्थांकडून स्वारस्य देकार मागविले असून, फूड स्टॉलच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा महापालिकेचा हेतू आहे.

गेल्या वर्षी मनपाने 8 जुलैपासून शहर बससेवा सुरू केली होती. महापालिकेने स्वतः बससेवा सुरू करण्याऐवजी ऑपरेटर्सची नियुक्ती केली असून, चालक व वाहकांचेदेखील आउटसोर्सिंग करण्यात आले आहे. सिटीलिंकतर्फे शहरात सध्या 42 मार्गांवर 148 बसेस चालविल्या जात असून, एका बसच्या माध्यमातून महामंडळाला प्रतिकिमीला 45 रुपये उत्पन्न मिळत आहे. महापालिकेने हेच उत्पन्न 72 रुपये अपेक्षित धरले होते. किमीमागे 26 रुपये इतका तोटा येत असल्याने तो तोटा काही अंशी भरून काढण्याच्या द़ृष्टीने प्रत्येक बस पिकअप शेडच्या ठिकाणी फूड कोर्ट उभारण्याचा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे.

8 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 27 कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज मनपाने गृहीत धरला आहे. फूड स्टॉलबरोबरच बसथांब्यांच्या ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातूनदेखील उत्पन्न वाढविण्यात येणार आहे. महामंडळाने पाच टक्के भाडेवाढीचा प्रस्तावही सादर केला असून, त्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते कमलेश बोडके, सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बंड, शहर अभियंता नितीन वंजारी, बोधिकिरण सोनकांबळे उपस्थित होते.

मद्यपी चालकांची हकालपट्टी करणार
सिटीलिंक शहर बससेवेत कंत्राटी पद्धतीने लावण्यात आलेल्या वाहक व चालकांवर नियंत्रण ठेवण्याच्या द़ृष्टीने कार्यपद्धती तयार करण्यात आली असून, महामंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. मद्यपान करून वाहन चालविताना चालक आढळून आल्यास त्याची हकालपट्टी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button