नाशिकच्या राजकारणातील ‘नॉनप्लेइंग कॅप्टन्स’ | पुढारी

नाशिकच्या राजकारणातील ‘नॉनप्लेइंग कॅप्टन्स’

प्रताप म. जाधव : नाशिक

महापालिका निवडणुका कधी होतील, याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी शहरातील रोजच्या राजकीय घडामोडी कानावर पडणार्‍या नाशिककरांना त्या अगदी जवळ येऊन ठेपल्याचे कळून चुकले असेल. पाच वर्षांपूर्वी हजारो नाशिककरांच्या साक्षीने या महानगराला दत्तक घेणारे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे सुपरस्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्याच्या प्रारंभी ठिकठिकाणी विकासकामांची उद्घाटने करून गेले. पक्ष मेळाव्यात त्यांनी भगव्याची शान राखणे केवळ आपल्या आणि आपल्याच हातात असल्याचा उद्घोष करत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचाही प्रयत्न केला. फडणवीसांप्रमाणे इतर पक्षांचे नेतेही पाइपलाइनमध्ये आहेत. त्यांचे दौरे ठरलेही होते; पण ईडीने अन्य कामांना लावल्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम बदलल्याचे दिसते. मुंबईतील त्या कामातून फुरसत मिळाली, की तेही नाशिकला येतील आणि विकासकामांसाठी टिकाव मारण्याबरोबरच निवडणूक जिंकण्यासाठी काय केले पाहिजे, याची दिशा कार्यकर्त्यांना दाखवतील.

सध्या शहरात जागोजागी उडालेला उद्घाटनांचा बार पाहता केवळ सत्ताधारी भाजपच नव्हे तर सर्वच पक्षांनी साडेचार वर्षांच्या कुंभकर्णी निद्रेतून जागे होत, आळोखेपिळोखे देत, ‘चला आता तरी कामाला लागले पाहिजे’ असा साक्षात्कार झाल्याप्रमाणे कामांना सुरुवात केल्याचे दिसते. आता सुरू केलेली कामे पूर्ण केव्हा होतील, या आधी ती का केली नाहीत, फक्त मते मागण्यासाठी गल्लीबोळातील घरांचे उंबरठे झिजवायचे आहेत म्हणून कुदळ-पावडे घेऊन पुढे सरसावला आहात का, असे प्रश्न भीडस्त मतदाराच्या मनातच राहतील. कारण या प्रश्नांची उत्तरे यापूर्वी ना कधी मिळाली, ना पुढे कधी मिळतील. ‘हे असंच चालणार’, अशी मनाची समजूत घालत आता नवीन कोण नशिबी येतो, याची प्रतीक्षा करणे एवढेच सामान्य मतदारांचे भागध्येय होते आणि राहील. शांत राहून जे जे होईल ते ते पाहणे आणि मतदानाच्या दिवशी त्यातल्या त्यात बरा निवडून त्यापुढील बटन दाबून येणे हेच तुमच्या-आमच्या हाती आहे..

..पण आपण शांत बसलो तरी शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या राजकारणी मंडळींना गप्प बसून चालणार आहे का? भाजपला सत्ता टिकवायची आहे, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे लढत ती भाजपकडून हिसकावून घ्यायची आहे. त्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. सत्ता टिकवणे तेवढे सोपे जाणार नाही, याची वास्तववादी कल्पना आलेल्या या पक्षाने प्रभारी म्हणून पुन्हा माजी मंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक केली आहे. सहप्रभारीची पदावनती दिलेल्या जयकुमार रावल यांच्या काळात पक्षात गटबाजी आणि अस्वस्थता वाढल्याचे घेण्यात आलेले आक्षेप या बदलामागे असावेत. सर्व संकटांवर मात करण्याचे रेकॉर्ड नावावर असलेल्या महाजन यांना नेमून पक्षाने महापालिका निवडणुकीत विजय म्हणजे संकटावर मात ठरणार असल्याचेच एक प्रकारे मान्य केले आहे. दुसरे म्हणजे, पक्षाचे शहर नेतृत्व निवडणुकीच्या लढाईत अपुरे पडेल, याचीही जाणीव पक्षाला झालेली दिसते. गेल्या वेळची निवडणूक लढवताना बाळासाहेब सानप यांच्यासारखे मोठा जनसंपर्क आणि पंचवटीबरोबरच अन्य शहरातही प्रभाव असलेले शहराध्यक्ष होते. विद्यमान अध्यक्ष गिरीश पालवे यांची काम करण्याची तळमळ, पक्षनिष्ठा वाखाणण्याजोगी आहे; पण निवडणुकीच्या तुंबळ राजकारणात एवढ्याच गोष्टी पुरेशा ठरत नाहीत.

त्यातही भाजपसारख्या सर्व स्तरात पसरलेल्या पक्षावर पकड बसवण्यासाठी आवश्यक मटेरियल पालवे यांच्यात आहे का, हा प्रश्नच आहे. तसे पाहिले तर अन्य पक्षांपुढेही हाच प्रश्न असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे विविध आंदोलनांमध्ये पक्षाला हिरीरीने फ्रंटवर ठेवत असले तरी जेव्हा संपूर्ण शहरात संघटनेच्या वाढीचा अन् नियंत्रणाचा मुद्दा येतो, तेव्हा भ्रमनिरास होतो. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रभावाचा पक्षाला लाभ करून देण्याची जबाबदारी ठाकरे यांना निवडणुकीत पेलावी लागेल. याच पक्षाचा मित्रपक्ष काँग्रेसला तर शहराध्यक्ष नेमण्याचीही घाई नाही. अधिकृत नेतृत्वाविना निवडणूक लढवण्याचा नवा काँग्रेसी प्रयोग यावेळी नाशिककरांना पाहायला मिळू शकतो. खेळांमध्ये काही वेळा नॉनप्लेइंग कॅप्टन नेमले जातात. प्रत्यक्ष मैदानावर न उतरता अन्य खेळाडूंना मार्गदर्शन करून संघाला विजय मिळवून देण्याची त्यांची जबाबदारी असते. आता हे शहराध्यक्ष केवळ ‘नॉनप्लेइंग’ राहतात, की आपल्या संघाला विजयाप्रत नेतात, ते पाहायचे.

हेही वाचा :

Back to top button