जळगाव पुढारी वृत्तसेवा : वाचाल तर वाचाल अशी म्हण असून प्रतिकूल परिस्थितीतही व्यक्ती घडविण्याचे कार्य ग्रंथ आणि ग्रंथालये करीत असतात. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालय जीवनातील अविभाज्य घटक आहे. ग्रंथ हे महत्वाचे शस्त्र असून ग्रंथालय हेच ज्ञानाचे देवालय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथालय समिती कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मंत्री गुलाबराव पाटील व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या ग्रंथालयाच्या सौर उर्जा प्रणालीसाठी अतिरिक्त ३१ लाख रूपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती देखील दिली. तसेच त्यांनी ग्रंथालय कर्मचार्यांच्या मागण्यांसह अन्य समस्या लवकरच मार्गी लावण्याचे ना. सामंत यांना साकडे देखील घातले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथालय समितीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील तर उदघाटक म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांची उपस्थिती होती. तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. शिरीष चौधरी, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिक्षक अभियंता रूपा राऊळ-गिरासे, कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई, सहायक अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत, ग्रंथालय विभागाच्या संचालिका शालीन इंगळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, ग्रंथालय सेनेचे पी.एम. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
समस्या निराकरणासाठी प्रयत्न – ना. उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी आपल्या भाषणातून या नूतन वास्तूबाबत कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले की, येथे दिव्यांग, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा करण्यात आली असल्याची बाब लक्षणीय वाटली. आज ग्रंथालयांच्या अनेक समस्या असून याचे निराकरण करण्याचे आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर, काही ग्रंथालये हे कागदोपत्री चालविण्यात येत असून काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. वाचनाचे जीवनातील महत्व हे मोठे असून याचे सर्वात चांगले उदाहरण हे ना. गुलाबराव पाटील यांचेच असल्याचे ते म्हणाले.
वाचनाचे महत्व अबाधीत – ना. गुलाबराव पाटील
ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून वाचनाचे महत्व अधोरेखित करतांना आज तंत्रज्ञान हे कितीही अद्ययावत बनलेले असले तरी वाचनाचे महत्व अबाधीत असल्याचे नमूद केले. याप्रसंगी त्यांनी ना. उदय सामंत यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने जिल्ह्यात नवीन ग्रंथालयांना मान्यता, ग्रंथालयांची दर्जावाढ, कर्मचार्यांच्या मानधनाचा प्रलंबीत प्रश्न आदी प्रमुख प्रश्नांचा उल्लेख केला. यावर निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली. तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करता यावा म्हणून जळगाव येथे आयपीएस दर्जाचे ग्रंथालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ४० लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
प्रास्ताविक ग्रंथालय विभागाच्या संचालिका शालीनी इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोक यांनी मानले.