जळगाव पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यातील चिनावल येथील शेती शिवारामध्ये काल रात्री दोन ते तीन शेतकऱ्यांच्या शेतात ठेवलेल्या ठिबक नळ्या जाळून टाकण्यात आल्या व केळीचे खोड कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडून टाकले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने व पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने आज सावदा येथील बसस्थानकासमोर शेतक-यांनी रस्ता रोको केला.
दोन तास आंदोलन केल्यानंतर व अप्पर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली व आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, भक्ती किशोर दाजी ,खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी अन्य मान्यवर उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील चिनावल या गावात शेतकरी वर्ग अज्ञात चोरट्यांनी मुळे त्रस्त झालेला आहे. शेतकरी वर्गाचे केळीचे घड झाडे अज्ञातांकडून कापून फेकण्यात येत आहेत. केळीचे घड तोडून घेऊन पळून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या महिनाभरापासून हे प्रकार सुरू असूनही पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आणि चोर राजरोसपणे गावात फिरत आहेत. (दि. 26) च्या रात्री चिनावल गावातील प्रमोद भंगाळे या शेतकऱ्याच्या दोन लाख रुपयांच्या ठिबकच्या नळ्या अज्ञातांनी जाळून टाकल्या व बाराशे ते तेराशे खोड कापून फेकले. तसेच बळीराम आनंदाने नेमाडे व प्रमोद सपकाळे यांच्याही शेतातील नळ्या जाळण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढल्याने शेतकऱ्यांनी सावदा येथे येऊन बस स्थानकाजवळ अचानक रस्ता रोको आंदोलन केले. सावदा पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही, तोपर्यंत रस्तारोको थांबणार नाही अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली.
शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला असता रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी हेसुद्धा त्या ठिकाणी आले. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन आपण याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केलेली आहे. रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असून पोलिस बंदोबस्त वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तरीही आपण याबाबत गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून राखीव दल वाढवण्याबाबतीत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रास्ता रोको केल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी हेही सावदा येथे आले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने श्रीकांत सरोदे यांनी भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वी एका आरोपीला मोटार सायकल सहित पोलीस स्थानकात पकडून दिले होते. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिले व तो मुलगा आजही आमच्या समोरून फिरत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांना विचारले असता तो अल्पवयीन आहे असे सांगितले. अल्पवयीन मुलगा जर मोटार सायकल चालवत असेल तर तो गुन्हा होत नाही का ? असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी मी स्वतः करणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली.