नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 21 वा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि.2) सकाळी 11 ला आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत ऑनलाइन पद्धतीने होणार्या या सोहळ्यात 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तसेच 10,236 विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येणार आहे.
दीक्षांत सोहळ्याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी माहिती देताना सांगितले की, या सोहळ्यासाठी कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 10,236 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, रोख रक्कम व पारितोषिक तसेच 38 विद्यार्थ्यांना पीएच.डी. केली जाणार आहे. कोरोनाचे निर्बंध बघता शासनाच्या सूचनांप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने हा सोहळा घेण्यात येणार आहे.
या समारंभाचे https://t.jio/MUHSconvocation यावरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी सदर दीक्षांत समारंभाचे प्रक्षेपण ऑनलाइन पाहावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.