नाशिक मनपा : कर्मचार्‍यांनो, मालमत्ता कर भरा ; अन्यथा वेतन बंद, आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिक मनपा : कर्मचार्‍यांनो, मालमत्ता कर भरा ; अन्यथा वेतन बंद, आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कर आणि पाणीपट्टीपोटी मोठ्या प्रमाणावर थकबाकी येणे असल्याने 2021-22 च्या अंदाजपत्रकात वसुलीमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे आता करवसुलीसाठी नाशिक मनपा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, मालमत्ता व पाणीपट्टी कर न भरणार्‍या महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांचे जानेवारी महिन्याचे वेतन अदा न करण्याचे आदेश नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.

यासंदर्भात आयुक्त जाधव यांनी 27 जानेवारी रोजी परिपत्रक जारी करत अधिकारी व कर्मचार्‍यांनी कर भरणा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांचे जानेवारी 2022 पेड इन फेब—ुवारी 2022 चे वेतन अदा करू नये, असे स्पष्ट आदेश खातेप्रमुखांना दिले आहेत. नाशिक महापालिकेची अर्थव्यवस्था ही शासनाकडून मिळणार्‍या जीएसटी परताव्याव्यतिरिक्त करवसुली, पाणीपट्टी, विकास निधी या घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने बाकी आहेत. चालू आर्थिक वर्षात आयुक्तांनी उद्दिष्ट ठेवलेल्या अंदाजपत्रकात जवळपास 400 कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम झालेला असल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे. (नाशिक मनपा)

त्यामुळे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीत वाढ होण्यासाठी आयुक्तांनी आता महापालिका कर्मचार्‍यांवरही आपला फोकस केला आहे. नाशिक मनपाच्या अनेक कर्मचार्‍यांकडे मोठ्या प्रमाणावर कर थकबाकी असल्याची बाब आढळून आल्याने आयुक्तांनी कर भरल्याशिवाय वेतन अदा न करण्याची भूमिका घेतली आहे.

खातेप्रमुखांनी परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कर्मचार्‍यांचे दरमहा वेतन 7 तारखेच्या आत होत असते. अद्याप वेतन अदा होण्याची तारीख दूर असल्याने त्याआतच कर भरणा करून त्याची पावती आणि प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कर्मचार्‍यांची धावपळ सुरू होती. कारण शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सलग सुटीचे आल्याने त्याच्या आतच प्रमाणपत्र सादर न झाल्यास वेतन अदा न होण्याची भीती कर्मचार्‍यांमध्ये आहे.

सोसायटी अध्यक्षांना आवाहन करा
पाणीपट्टी, घरपट्टी भरल्यानंतर दिलेल्या नमुन्याप्रमाणे लेखी प्रमाणपत्र भरणा पावतीच्या प्रतीसह वेतन आहरण अधिकार्‍याकडे सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. कर्मचारी सामायिक सोसायटी तसेच इमारतीत राहात असल्यास मनपा कर्मचार्‍यांनी सोसायटीचे अध्यक्ष तसेच सचिवांना कर भरण्याबाबत आवाहन करावे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button