अकोला : तेल्हाऱ्यात बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड

अकोला : तेल्हाऱ्यात बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण फाटा येथे लोकांना बनावट नोटा देऊन त्या बदल्यात सुटे म्हणून खऱ्या नोटा घेणाऱ्या टोळीला तेल्हारा पोलिसांनी शिताफिने पकडले. आरोपींकडून 24 लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना 2 फेब्रुवारीरोजी रात्री अटक केली आहे. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

तेल्हारा पोलीस नियमीत गस्तीवर असताना त्यांना खबर मिळाली की, पंचगव्हाण फाटा येथे चार इसम बनावट नोटा देऊन त्या बदल्यात सुटे म्हणून खऱ्या नोटा घेऊन लोकाना फसवीत आहेत. ही खबर लागताच गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल सोळंके, नापोकॉ सरदारसिंग डाबेराव, पोकॉ अमोल नंदाने, योगेश ऊमक, संदिप तांदूळकर, हरिशंकर शुक्ला हे पंचगव्हाण फाटा येथे पोचले.

त्या ठिकाणी बनावट नोटा देणाऱ्यावर या पथकाने छापा घातला. त्यात तिघांना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी झालेत तर फरार होण्यात एक गुन्हेगार यशस्वी झाला. फरार झालेल्याचे नाव विजय ठाकुर असून तो खामगाव (जि. बुलडाणा) येथे राहतो. अटक केलेल्यांची नावे अमित आत्माराम कटारे (वय-27 रा. चिस्ताळा ता. मानोरा, जि. वाशिम), अमोल गोविंद कटारे (वय-22 रा. चिस्ताळा, ता. मानोरा, जि. वाशिम) आणि वैभव चंदु दयाळ (वय-22 रा. हिवरदरी ता. महागाव जि. यवतमाळ) असे आहे.

या तिघांकडून पोलिसांनी 23 लाख 96 हजारांच्या बनावट नोटा, 54 हजाराच्या खऱ्या नोटा,चारचाकी गाडी (क्र. एमएच 43 एएल 776) किंमत दहा लाख, आणखी एक चारचाकी (एमएच 30 सिएस 2743) किंमत 12 लाख असा ऐवज जप्त केला. अटकेतील तिघांवर भादवी कलम 489-ब, 489-ई, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरु असून पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनात पोऊनि. गणेश कायंदे करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर अकोट यांच्या मार्गदर्शनात सपोनि ज्ञानोबा फड, पोउनि गणेश कायंदे, पोहेकॉ अमोल सोळंके, नापोका सरदारसिंग डाबेराव, पोकॉ संदिप तांदुळकर, योगेश  उमक, हरिशंकर शुक्ला, अमोल नंदाने यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news