पंचवटी : पुढारी वृत्तसेवा : नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेच्या आराखड्यात आधीच्या प्रभागांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून, बड्या नेत्यांच्या सोयीने ही रचना करण्यात आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अॅड. सुरेश आव्हाड यांनी नवीन प्रभाग 1 व 8 च्या रचनेबाबत हरकत नोंदविली.
अॅड. आव्हाड यांनी नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांना पत्र सादर केले. त्यानुसार, नवीन प्रारूप प्रभागरचनेमध्ये पंचवटीतील बड्या नेत्यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या सोयीनुसार प्रभाग तयार केले आहेत. सर्वच नवीन प्रभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असणार्या एकाच परिसराच्या काही भागांचे विभाजन करण्यात आलेले आहे. ही रचना करत असताना नैसर्गिक नाले, नदी, पाट तसेच मुख्य रस्ते विचारात न घेता केवळ काही नेत्यांचा फायदा करण्यासाठी हे प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत, असा आरोपही केला आहे.
विशेष म्हणजे जुन्या प्रभाग 6 मधील हनुमानवाडी, क्रांतीनगर, रामवाडी हे परिसर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच प्रभागाचा व गावठाणचा भाग होते. परंतु आता नवीन प्रभागरचनेनुसार या भागांचे तुकडे करण्यात आले आहे. नवीन प्रभाग क्र.1 लादेखील मोठा पाट, नाला ओलांडून परिसर जोडण्यात आला आहे. काही मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही नवीन प्रभागरचना झाल्याची व प्रभागरचनेचा गोपनीय आरखडा या आधीच फुटल्याचा आरोपही अॅड. आव्हाड यांनी केला आहे.
रामवाडी, हनुमानवाडी, मोरे मळा, क्रांतीनगर, मखमलाबाद हा भाग आजवर एकाच प्रभागात राहिलेला आहे. आधीच्या प्रभाग 6 मध्ये असलेल्या या भागांचे यंदा विभाजन होऊन 1 आणि 8 या नव्या दोन प्रभागांत विभागले गेले आहेत. मनपाने नवीन प्रभाग 8 मध्ये समाविष्ट केलेला क्रांतीनगर, उदय कॉलनी, गणेश चौक आदी परिसर नवीन प्रभाग 1 मध्ये समाविष्ट करावा.
– अॅड. सुरेश आव्हाड, तक्रारदार
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.