Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय घडामोडी : मुख्यमंत्र्यांआधीच इच्छुक दिल्‍लीला? | पुढारी

Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय घडामोडी : मुख्यमंत्र्यांआधीच इच्छुक दिल्‍लीला?

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : मंत्रिमंडळ विस्तार आणि पुनर्रचनेबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा दिल्‍ली दौरा निश्‍चित झाला आहे. पण मंत्रिपदासाठी इच्छुक असणार्‍या काही आमदारांनी त्यांच्याआधीच दिल्‍लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Karnataka Politics)

परिवहन मंत्री श्रीरामुलू यांनी दिल्‍ली गाठली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली असून उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे लॉबिंग सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे निकटवर्तीय जनार्दन रेड्डी यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांच्या निमंत्रणानुसार मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एम. पी. रेणुकाचार्य सोमवारी दिल्‍लीला जात आहेत. आमदार एम. पी. कुमारस्वामी, राजूगौडा नाईक, तिप्पारेड्डी, रामदास, सतीश रेड्डी, अरविंद लिंबावळी, गुळीहट्टी शेखर, सोमशेखर रेड्डी, अप्पूगौडा पाटील, पूर्णिमा श्रीनिवास, विधानसभेचे उपसभापती आनंद मामणी यांच्यासह सुमारे 12 आमदार दिल्‍लीला जाणार आहेत.

याआधीच पक्षश्रेष्ठींनी सर्व आमदारांना कोणत्याही कारणात्सव दिल्‍ली दौरा करु नये, अशी सूचना केली होती. पण, आपापल्या गॉडफादरद्वारे ते मंत्रिपदासाठी लॉबिंगची तयारी करत आहेत. सरकारचा कार्यकाळ केवळ वर्षभर आहे. या काळात मंत्रिपद मिळवून आपापल्या मतदारसंघात प्रभाव वाढवण्याचा विचार आमदारांचा आहे.

Karnataka Politics : बोम्मईंची दिल्‍लीवारी सोमवारी

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कसरत सुरू केली आहे. मंत्रिपदासाठी असंतुष्ट आमदारांकडून दबाव येत असल्याने त्यांनी गुरुवारी दिल्ली दौरा ठरवला होता; पण ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला असून येत्या सोमवारी ते दिल्लीला जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरचनेचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्रिपदी येऊन बोम्मई यांना सहा महिने लोटले आहेत. मंत्रिमंडळात आणखी चार पदे रिक्‍त आहेत. या पदांसाठी सुमारे दोन डझन आमदार इच्छुक आहेत. त्यांच्याकडून वारंवार जाहीरपणे मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. त्याविषयी मुख्यमंत्री बोम्मई यांनी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे.तातडीने मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीचे बोलावणे आले होते. मात्र, ऐनवेळी श्रेष्ठींकडून मिळालेल्या सूचनेने त्यांनी गुरुवारचा दौरा रद्द केला.

Back to top button