इस्लामपूर : बिगरशेती खरेदी – विक्री व्यवहार बंद! | पुढारी

इस्लामपूर : बिगरशेती खरेदी - विक्री व्यवहार बंद!

इस्लामपूर : सुनील माने
चाळीस गुुंठ्यांच्या आतील तसेच गुंठेवारी नसलेले प्लॉॅट व जमीन खरेदी-विक्री व्यवहार सात महिन्यांपासून ठप्प आहेत. शासनाच्या तिजोरीत जमा होणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फिरले आहे. त्यामुळे मालमत्ताधारक हबकून गेले आहेत.

बिगरशेती खरेदी – विक्री व्यवहार बंद!

शासनाने ही प्रक्रिया थांबवून बिगरशेती असणार्‍या प्लॉटचे व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. घर बांधण्यासाठी बिगरशेतीचा परवाना मिळविणे मोठीच कसरत ठरते. परवान्यासाठीच्या माध्यमातून सर्वसामान्यांबरोबर अनेक व्यावसायिकांनाही पळापळ करावी लागते.आता तर शासनाने 40 गुंठ्यांच्या वरील बागायत, जिरायत क्षेत्र असेल तरच खरेदी-विक्री व्यवहारास परवानगी दिली आहे. चाळीस गुंठ्यांच्या आतील अनेक प्लॉटधारकांचे दस्तच होत नाहीत. शासनाने जमीन व प्लॉट खरेदी-विक्रीसाठी अट घातल्याने लोकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे.

ग्रामीण भागात उच्चशिक्षित वर्ग तसेच नोकरीनिमित्त शहराकडे येणार्‍या लोकांची अधिक संख्या आहे. शहरांचा विस्तार वाढतो आहे. मात्र, जमिनीचे क्षेत्र आहे तेवढेच आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील प्लॉटच्या किमती गगनाला भिडत आहेत. पतसंस्था, बँकांमधील घोटाळे, शेअर बाजार, सोने व अन्य ठिकाणी गुुंतवणूक करणे जोखमीचे ठरत असल्याने प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढते आहे.

सर्वसामान्य, मध्यमवर्गीय लोक आपल्या स्वप्नातील घरासाठी जमिनीत गुंतवणूक करीत आहे. पण बिगरशेती परवानगीसाठीच्या त्रासातून त्यांचे स्वप्न भंग होत आहे. शासनाने आता खरेदी-विक्री व्यवहार पूर्णपणे बंद केल्याने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. सात महिन्यांपासून गुंठेवारीतील सर्व व्यवहार बंद आहेत. बिगरशेतीची फोड करता येत नाही, अशा जाचक अटी लादल्याने अनेक व्यवहार ठप्प आहेत. सध्या फक्‍त 40 गुंठ्यावरीलच खरेदी दस्त होत आहेत. वतन, देवस्थान आदी जमिनीचे व्यवहार करता येत नाहीत. शासनाने घातलेल्या जाचक अटींमुळे तहसील कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. पालिकेतही एन. ए. च्या शेकडो फाईल प्रलंबित आहेत. बांधकाम परवान्याच्या फाईल धूळ खात पडल्या आहेत.

पालिकेतील ही सर्व प्रक्रिया अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे, फाईलवर सह्या होत नसल्याने संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.गुंठेवारी, बांधकाम परवाना मिळविणे हे आता सर्वसामान्यांना जिकीरीचे झाले आहे. पालिकेतील नगररचना विभागाचे कर्मचारीच अधिकार्‍यांच्या अविर्भावात वावरत आहेत. येणार्‍या नागरिकांना कामासंदर्भात व्यवस्थित माहिती दिली जात नाही. जिथे तिथे लोकांची अडवणूक होत आहे. गुंंठेवारीची कामे, बांधकाम परवाने वेळेत करावीत, अशी मागणी होत आहे.

गुंठेवारीची समस्या ही शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत आहे. छोट्या – छोट्या शेतकर्‍यांना व्यवहार न करता आल्यामुळे सावकारीला बळ मिळाले आहे. खरेदी व्यवहार बंद असल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर निर्बंध उठवावेत.
– शकील सय्यद, इस्लामपूर शहर शिवसेनाप्रमुख

Back to top button