नाशिक हेल्मेटसक्ती : सात दिवसांत अडीच हजार चालकांवर कारवाई ; सुमारे 13 लाखांचा दंड वसूल | पुढारी

नाशिक हेल्मेटसक्ती : सात दिवसांत अडीच हजार चालकांवर कारवाई ; सुमारे 13 लाखांचा दंड वसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आलेली असून, त्यासाठी बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी दि. 21 ते 29 जानेवारी दरम्यान, विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या दोन हजार 540 चालकांवर दंडात्मक व समुपदेशनाची कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 82 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मागील वर्षभरातील अपघातांमध्ये हेल्मेट नसल्यामुळे शहरात शंभरहून अधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. याची दखल घेत पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमा राबवून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त केले आहे. त्यात हेल्मेट नसलेल्या चालकांना दोन तास समुपदेशन करून त्यात हेल्मेट वापराचे फायदे, वाहतूक नियमांची माहिती देऊन लेखी परीक्षा घेतली जात आहे. तरीदेखील हेल्मेटचा अपेक्षित वापर न वाढल्याने शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार दि. 21 ते 29 जानेवारी दरम्यान, रविवारी (दि. 23) व प्रजासत्ताक दिन (दि. 26) वगळता पोलिसांनी सात दिवसांत शहरात ठिकठिकाणी बेशिस्त चालकांवर कारवाई केली. त्यात विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या अडीच हजारांहून अधिक चालकांवर कारवाई करण्यात आली.

महिला चालकांवरही कारवाई
या मोहिमेत महिला चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. महिलांनी विविध कारणे सांगून सुटका करण्याचे प्रयत्न केले. मात्र, पोलिसांनी हेल्मेट वापराचे फायदे समजावून सांगत व दंडात्मक कारवाई केली. कारवाईमुळे पैशांसोबतच वेळही खर्ची होत असल्याने हेल्मेट घालण्यास प्राधान्य दिले जात आहे.

पळवाटांमुळे अपघातास निमत्रंण
हेल्मेट वापराकडे आजही अनेक चालक दुर्लक्ष करताना दिसतात. हेल्मेट जवळ असले, तरी त्याचा वापर करण्याकडे त्यांचा कल नसतो. मात्र, पोलिस दिसताच ते हेल्मेट घालतात, तर अनेक चालक रस्त्यावरच दुचाकीचा वेग अचानक कमी करून किंवा यू टर्न घेऊन पळवाट शोधतात. अशा वेळी पाठीमागील वाहनासोबत अपघात होण्याची शक्यता असते.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button