पुणे : मयत पास मिळवण्यासाठी नातेवाईकांची ससेहोलपट; चोवीस तास पास केंद्र नावालाच

पुणे : मयत पास मिळवण्यासाठी नातेवाईकांची ससेहोलपट; चोवीस तास पास केंद्र नावालाच
Published on
Updated on

पुणे; हिरा सरवदे : मयत पास देण्याची चोवीस तास व्यवस्था केलेल्या रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या कामचुकारपणाचा फटका मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना बसत आहे. रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून विविध कारणे सांगून पास देणे टाळले जाते, नातेवाईकांना वैकुंठ स्मशानभूमी किंवा इतर ठिकाणांची नावे सांगितली जातात. त्यातच मनुष्यबळाच्या अभावामुळे वैकुंठ स्मशानभूमीत सुरू केलेली चोवीस तास सेवा पाच दिवसातच बंद करण्यात आली. त्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची चांगलीच ससेहोलपट होत आहे.

महापालिका हद्दीत एखाद्या व्यक्तीचा अपघाती, आजाराने किंवा नैसर्गीक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेचा मयत पास असणे बंधनकारक आहे. खासगी किंवा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे, याचा उल्लेख असलेले प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र महापालिकेच्या मयत पास केंद्रात दिल्यानंतर मयत पास मिळतो. तर घरी मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक नगरसेवक प्रमाणपत्र देतात, त्या प्रमाणपत्रावर मयत पास दिला जातो. एखाद्या मध्यम वयीन वक्तीचा घरी मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करून पोलिस पंचनाम्यानंतर मयत पास मिळतो. मयत पास स्मशानभूमीत दिल्यानंतरच पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातात.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी मयत पास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तर विद्युत विभागाच्यावतीने केवळ कोवीडमुळे मृत्यू झालेल्यांचे ऑनलाईन मयत पास दिले जातात. नागरिकांना रात्री अपरात्री पास मिळावा, यासाठी महापालिकेच्या 19 रुग्णालयांमध्ये व ससून रुग्णालयामध्ये चोवीस तास पास केंद्र सुरू केले आहे. पूर्व विश्रामबागवाड्यात चोवीस तास मयत पास केंद्र होते, मात्र ते बंद करण्यात आले आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील वैकुंठ स्मशान भूमीतही मयत पास केंद्र आहे.

मात्र, महापालिकेच्या 19 रुग्णालयांमध्ये हव्या त्या वेळी मयत पास मिळत नाहीत. पास देणारे कर्मचारी जागेवर उपस्थित नसतात. अनेक वेळा उपस्थित असले तरी इतर कारणे आणि कामे सांगून दुसरीकडून पास घ्या, असे सांगितले जाते. बहुतांश वेळा मयत पास घेण्यासाठी नातेवाईकांना वैकुंठ स्मशानभूमीतच पाठवले जाते. त्यातच वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मयत पास सकाळी 9 ते 5 या वेळेतच मिळतो.

त्यानंतर मयताच्या नातेवाईकांना महापालिकेच्या या रुग्णालयातून त्या रुग्णालयात मयत पाससाठी फिरावे लागते. या सर्व परिस्थितीला ससून रुग्णालयातील केंद्र मात्र अपवाद आहे. या ठिकाणी चोवीस तास केव्हाही पास मिळतो.

वैकुंठातील चोवीस तास सेवा पाच दिवसात बंद

मध्य शहरात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत शहरातील जवळपास 60 टक्के मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी वैकुंठ स्मशान भूमीत 2007 साली मयत पास केंद्र कार्यान्वीत आहे. विश्रामबागवाड्यातील केंद्र बंद केल्यानंतर वैकुंठातील केंद्र चोवीस तास सुरू राहील, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते. मात्र, या ठिकाणी आरोग्य कोटीतील दोनच कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने या ठिकाणी कर्मचारी दिले नाहीत. जन्म-मृत्यू विभागाने कर्मचारी दिल्यानंतर 5 जानेवारी 2022 रोजी येथील सेवा चोवीस तास सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, दिलेले कर्मचारी पुन्हा काढून घेतल्याने चोवीस तास सेवा 10 जानेवारीपासून म्हणजे केवळ पाच दिवसात बंद करण्यात आली.

रुग्णालयानेच आम्हाला वैकुंठात पाठवले

वैकुंठ स्मशानभूमीतील मयत पास केंद्रावर येणार्‍या नातेवाईकास तुमच्या भागातील दवाखन्यात व्यवस्था असताना इकडे का आलात ? तुमची काय तक्रार आहे का ? असे प्रश्न विचारून येथील वहीत तक्रार नोंद करण्यास सांगितले जाते. या वहीत सर्रासपणे चोवीस तास सेवा असलेल्या रुग्णालयांनी कर्मचाऱ्यांनी विविध कारणे देवून मयत पास देणे टाळून वैकुंठात पाठवल्याच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.

समाविष्ट 11 गावांमध्येही सुविधा

महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 11 गावांच्या ग्रामपंचायत इमारतींमध्ये कार्यालयीत सुट्टी सोडून सकाळी 10 ते 5. 45 या वेळेत मयत पास दिला जातो. सुट्टीच्या दिवसी किंवा सायंकाळी सहा नंतर या गावातील नागरिकांना शहरात येवून एखाद्या केंद्रातून मयत पास घ्यावा लागतो.

या रुग्णालयात आहेत 24 तास मयत पास केंद्र

1) मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुती गृह, साने गुरूजी नगर
2) औंध कुटी प्रसुती गृह, औंधगांव
3) संजय गांधी प्रसुती गृह, बोपोडी
4) डॉ. दळवी रुग्णालय, शिवाजी नगर
5) अण्णासाहेब मगर प्रसुती गृह, मगरपट्टा
6) डॉ. होमी जे. भामा प्रसुती गृह, वडारवाडी
7) सुतार प्रसुती गृह, कोथरूड
8) सखाराम कोद्रे प्रसुती गृह, मुंढवा
9) सहदेव निम्हण प्रसुती गृह, पाषाण
10) सोनवणे प्रसुती गृह, भवानी पेठ
11) नामदेव शिवरकर प्रसुती गृह, वानवडी
12) राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
13) सावित्रीबाई फुले प्रसुती गृह, गुरुवारपेठ
14) मिनाताई ठाकरे प्रसुती गृह, कोंढवा
15) मालती काची प्रसुती गृह, गाडीखाना
16) राजमाता जिजाऊ प्रसुती गृह, मित्रमंडळ चौक, पर्वती
17) काशिनाथ धनकवडे प्रसुती गृह, बालाजीनगर
18) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
19) डॉ. नायडू रुग्णालय, रेल्वे स्टेशन
20) ससून रुग्णालय, रेल्वे स्टेशन

सर्वच स्मशान भूमीत चोवीस तास सेवा द्या

मागील आठवड्यात माझ्या मेव्हण्याचा पुना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मयत पाससाठी आम्ही वैकुंठात गेलो, मात्र तेथील केंद्र बंद होते. त्यानंतर आम्ही इतर चार ठिकाणी मयत पाससाठी फिरलो. शेवटी मित्र मंडळ चौकातील राजमाता जिजाऊ प्रसुती गृह येथे मयत पास मिळाला. यामध्ये जवळपास दोन तास गेले. शहराची माहिती नसलेल्या नातेवाईकांनी रात्री अपरात्री कोठे रुग्णालये शोधायची. मिळाले तर तेथे कर्मचारी असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे शहरातील सर्वच स्मशान भूमीत चोवीस तास मयत पास मिळण्याची याची व्यवस्था महापालिकेने करावी.

– बाळासाहेब रुणवाल, अध्यक्ष, मेरे आपने संस्था

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news