आयमा निवडणुकीत 70 टक्के मतदान ; आज मतमोजणी, दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट | पुढारी

आयमा निवडणुकीत 70 टक्के मतदान ; आज मतमोजणी, दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संस्थेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 30) 70 टक्के मतदान झाले असून, प्रक्रिया शांततेत पार पडली. यात 1954 मतदारांपैकी 1379 मतदारांनी मतदान केले. मतमोजणी आज सोमवारी (दि. 31) सकाळी साडेआठ वाजता सुरू झाली आहे. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी उद्योग विकास पॅनल यांच्यात सरळ लढत होत आहे.

आयमा निवडणुकीसाठी सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यात सकाळ सत्रात सत्ताधारी एकता पॅनलचे नेते व उमेदवार तसेच विरोधी पॅनलचे उद्योग विकास पॅनलचे नेते व उमेदवारांनी मतदान केले. सत्ताधारी एकता पॅनलचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे व मावळते अध्यक्ष वरुण तलवार यांच्यासह माजी पदाधिकार्‍यांनी केले, तर विरोधी उद्योग विकास पॅनलचे शशी जाधव, तुषार चव्हाण यासह ज्येष्ठ उद्योजकांनी केले.

या निवडणुकीत सकाळ सत्रात मतदारांनी गर्दी केल्याने दुपारपर्यंत 40 टक्के मतदान झाले. दुपारनंतर पुन्हा मतदारांनी गर्दी केल्याने सायंकाळी 5 पर्यंत 70 टक्के मतदान झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न असफल झाल्यानंतर एकता व उद्योग विकास या दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. सोमवारी मतमोजणीनंतर आयमा संघटनेला नवीन कार्यकारिणी मिळणार आहे.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी निखिल पांचाल व संजय महाजन, उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र पानसरे व श्रीपाद कुलकर्णी, सरचिटणीस पदासाठी ललित बूब व एन. डी. ठाकरे, तर सेक्रेटरीच्या दोन जागांसाठी योगिता आहेर, गोविंद झा, जयंत पवार, कैलास आहेर. खजिनदार पदासाठी राजेंद्र कोठावदे व आर. एस. जाधव यांच्यात लढत होत आहे. तसेच 24 कमिटी सदस्यत्वासाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत. आयमा निवडणुकीत दोन्ही पॅनलने सभासदांपर्यंत पोहोचून प्रचार केला. मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. जी. जोशी यांनी दिली.

मतदान केंद्रात दोन्ही पॅनलचे काही उमेदवार गळ्यात हात घालून फिरत होते. त्यामुळे हसत-खेळत मतदान प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी एक-दोन बोगस मतदार उघडकीस आले. बोगस मतदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, हवालदार संजय राऊत, कैलास निंबेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

आयमा निवडणुकीत शांततेत मतदान झाले. सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सत्ताधारी एकता पॅनलचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सभासदांपर्यंत पोहोचून प्रचार केलेला आहे. निवडणुकीची मतमोजणी आज आहे. मतदारांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य असणार आहे.
– वरुण तलवार,
मावळते अध्यक्ष, आयमा

आयमा निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्वांनी कोविड नियमांचे पालन केले आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे मतदारांनी मतदान केले आहे. चांगले कामकाज केलेले असल्याने सत्ताधारी एकता पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून येतील.
– धनंजय बेळे, एकता पॅनलप्रमुख

आयमा निवडणुकीत मतदान केंद्रात नियोजन व्यवस्थित नव्हते. त्यामुळे आमचे उद्योग विकास पॅनलचे उमेदवार विजयाबाबत संदिग्ध आहे.
– तुषार चव्हाण, उद्योग विकास पॅनलप्रमुख

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button