जळगाव : रेल्वेच्या साहेबांनी फलाटावर पाय ठेवताच कर्मचारी पायपुसणी घेऊन धावला | पुढारी

जळगाव : रेल्वेच्या साहेबांनी फलाटावर पाय ठेवताच कर्मचारी पायपुसणी घेऊन धावला

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा 

इंग्रज गेले तरी सुद्धा आजही इंग्रज अधिकाऱ्यांच्या सोयीसुविधांच्या सवयी स्वतंत्र भारतातून अजुनी गेलेल्या दिसत नाहीत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचा मनमाड भुसावळ पाहणी दौरा होता. ते भुसावळ येथे आले असता, महाव्यवस्थापक विशेष रेल्वेच्या गाडीच्या बोगीतून उतरताना फलाटावर पाय ठेवणार त्यासाठी एक कर्मचारी हातात पायपुसणी घेऊन गाडीबरोबर चालत होता, तर दुसरा एक कर्मचारी गाडीचा दरवाजा उघडत होता. इंग्रज गेले मात्र त्यांचा थाटमाट अजूनही अधिकाऱ्यांमध्ये कायम असल्‍याचे यावरून दिसून येत आहे.

सर्व अधिकारी, कर्मचारी सकाळपासून तैनात

भारत पारतंत्र्यात असताना इंग्रज अधिकारी आपल्या सुख सोयींसाठी अनेक कर्मचारी ठेवत असत, कुठे दौऱ्यावर गेले असता त्यांच्यात सेवा व काम करण्यासाठी अनेक कर्मचारी त्या ठिकाणी ठेवलेले असतं, असाच काहीसा प्रकार मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्या मनमाड ते भुसावळ पाहणी दौऱ्यात दिसून आला. महाव्यवस्थापक पाहणी करीत असल्याने  मनमाड स्थानकापासून ते भुसावळ स्थानकापर्यंत सर्व अधिकारी, कर्मचारी सकाळपासून तैनात होते.

महाव्यवस्थापक येणार असल्याने रेल्वे परिसर चकाचक

महाव्यवस्थापक येणार असल्याने रेल्वे परिसर एकदम चकाचक करण्यात आला होता. कधी नव्हे ते आरपीएफ कर्मचारी स्टेशनच्या बाहेर बंदोबस्तात दिसत होते. अवैध वाहतूक करणारी वाहने अचानक गायब झालेली होती. महाव्यवस्थापक येणार म्हणून रेल्वे स्थानक परिरारात व स्थानकाला लागून असलेल्या बस स्थानका समोरील रस्ता गेल्या पंधरा दिवसात डांबरीकरण करून नवीन रस्ता तयार करण्यात आला.

गाडी थांबल्‍यावर ‘त्या’ कर्मचार्‍याने पायपुसणी तात्‍काळ फलाटावर टाकली…

महाव्यवस्थापक यांचे रेल्वेने भुसावळ स्थानकावर फलाट क्रमांक आठवर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी विशेष गाडी फलाटावर थांबण्यापूर्वीच त्या गाडीतून खाली उतरून एक कर्मचारी हातात पायपुसणी घेऊन रेल्वे गाडी  बरोबर चालत होता, जेणेकरून विशेष तपासणी रेल्वेच्या बोगी मधून महाव्यवस्थापक उतरतील त्या वेळी दरवाजा बाहेरील पायऱ्यांजवळ पायपुसणी  टाकता येईल. गाडी थांबल्‍या बरोबर त्या कर्मचार्‍याने हातामध्ये सोबत आणलेली पायपुसणी तात्‍काळ फलाटवर टाकली. त्या पायपुसणीवर पाय ठेवून महाव्यवस्थापक लाहोटी  यांचे भुसावळ रेल्वे  स्थानकावर आगमन झाले. त्यानंतर डीआरएम कार्यालयाकडे ते निघाले. येथेही गाडीचे दरवाजे उघडण्यासाठी माणसे तैनात होती.

गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी कर्मचारी…

महाव्यवस्थापक यांना गाडीतून बाहेर पाय ठेवण्यासाठी पायपुसणीची काय गरज होती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाव्यवस्थापक आपल्या घरात नव्हे ते पहाणी दौऱ्यावर व रेल्वेच्या कामाने विशेष रेल्वे गाडीतून प्रवास करीत होते. मग त्यांना रेल्वे गाडीच्या डब्यातून बाहेर उतरण्यासाठी  पायपुसणीची  खरच गरज आहे का? की त्यासाठी एक कर्मचारी ठेवण्यात आलेला होता. तसेच गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी सुद्धा कर्मचारी होता. हा लवाजमा कशासाठी व का हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे सर्व राजेशाही थाट कशासाठी व कोणासाठी असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महाव्यवस्थापक फलाटावर उतरतांना पायपुसणी हा प्रोटोकॉल आहेत का? मग हा जर  प्रोटोकॉल नाही तर मग पायपुसणी घेऊन कर्मचारी का फिरत होते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाव्यवस्थापक म्हणजे कोणी राजा महाराजा आहे की ज्यांच्यासाठी रेड कार्पेट किंवा अशी पायपुसणी ठेवण्याची पद्धत आहे. आजही मोठ्या अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला असे अनेक कर्मचारी फिरताना दिसतात. त्यामुळे इंग्रज गेले, मात्र त्यांच्या सवयी आजही अधिकाऱ्यांमध्ये कायम आहेत हे या प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येते.

Back to top button