भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण : पलकने दिली होती ‘आसाराम’ करण्याची धमकी | पुढारी

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण : पलकने दिली होती ‘आसाराम’ करण्याची धमकी

इंदूर : वृत्तसंस्था 

अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण संपविण्यात भय्यूजी महाराजांची मोठी भूमिका होती. त्यांचे खरे नाव उदयसिंह शेखावत होते. भय्यूजी महाराजांना मध्य प्रदेश सरकारकडून राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. भय्यूजी महाराजांनी सियाराम सूटिंग-शर्टिंगसाठी मॉडेलिंग केली होती. 29 एप्रिल 1968 रोजी मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूर येथे त्यांचा जन्म झाला. भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त असल्याची त्यांच्या भाविकांची श्रद्धा होती. भय्यूजी महाराज तासन्तास जलसमाधी घेत असत. क्रिकेट खेळत, शेतीकामे करत. घोडेस्वारी करत. महाराष्ट्रात त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जात असे.

भय्यूजी महाराज यांची पहिली पत्नी माधवी यांचे 2015 मध्ये निधन झाले. माधवीपासून त्यांना कुहू नावाची कन्या आहे. माधवीच्या निधनानंतर पलक या भय्यूजी महाराजांच्या शिष्येने कुहूची काळजी वाहिली. भय्यूजी महाराजांच्या जीवनातील माधवीची उणीवही भरून काढली. भय्यूजी महाराजांची दुसरी एक शिष्या डॉ. आयुषी शर्मा (ग्वाल्हेर) यांच्याशीही यादरम्यान जवळीक वाढली. तत्पूर्वी भय्यूजी आणि पलक यांच्यात समाजमाध्यमांतून झालेले ‘तसले’ बोलणे पलकने जपून ठेवले होते व भय्यूजींसह घालवलेले एकांतातल्या ‘त्या’ क्षणांचेही व्हिडीओही रेकॉर्ड करून ठेवले होते.

भय्यूजी यांनी डॉ. आयुषीशी लग्न करू नये म्हणून पलकने भय्यूजींवर दबाव आणायला सुरुवात केली. पण 30 एप्रिल 2017 रोजी भय्यूजींनी डॉ. आयुषी यांच्याशी लग्न केले. तत्पूर्वी भय्यूजी यांची कन्या कुहू हिला भय्यूजींच्या या दोन्ही महिलांशी असलेल्या प्रेमसंबंधांबद्दलची माहितीही मिळाली होती. बापलेकीच्या संबंधांतही यामुळे तणाव होता.

भय्यूजींच्या दुसर्‍या लग्नाच्या विरोधात कुहू होती. पलकही या लग्नाने भडकलेली होती. ती भय्यूजींना त्यांचे सेवक विनायक दुधाळे आणि चालक शरद यांच्यासमोर दमबाजी करत असे. तिने अखेर भय्यूजींना लग्नासाठी एक वर्षाचा अल्टीमेटम दिला. भय्यूजींनी लग्न केले नाही तर त्यांचा ‘आसाराम बापू’ करण्याची धमकी पलकने दिली होती. दुसरीकडे डॉ. आयुषी या भय्यूजींच्या ट्रस्टमध्ये नाहक हस्तक्षेप करत असल्याचा आरोप होऊ लागला. आयुषी या कुहूच्या मनात आपली जागाही बनवू शकल्या नाहीत. त्यातच संपत्तीवरून वाद सुरू झाले. या सगळ्यांचा कुहूच्या करिअरवर परिणाम नको म्हणून भय्यूजी महाराजांनी तिला लंडनला शिकायला पाठवून दिले.

पुढे भय्यूजी महाराजांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. याबाबत कुहूला कळले आणि ती पित्याबद्दलच्या चिंतेने त्यांच्याशी बोलू लागली. 10 जून 2018 रोजी रात्री एक ते दोनपर्यंत बापलेकींचे बोलणे झाले. भय्यूजी महाराजांनी तिला उद्याच इंदूरसाठी निघ म्हणून सांगितले. कुहू तडक निघालीही. यादरम्यान इंदूरमधील सिल्व्हर स्प्रिंगमधील निवासस्थानी भय्यूजींनी स्वत:वर गोळी झाडून घेतली (12 जून 2018). भय्यूजींनी आत्मघात केला तेव्हा कुहू पुण्याहून इंदूरच्या वाटेवर होती. भय्यूजी महाराजांच्या इंग्रजी सुसाईड नोटवर डॉ. आयुषींनी आक्षेप घेतला. ते हिंदीत लिहीत असत. मग अखेरची चिठ्ठी इंग्रजीत कशी लिहितील? आणि तपास सुरू झाला… पलक, विनायक दुधाळे आणि शरद शेवाळकर यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी खटल्याचा निकालही लागला. कुहूला माध्यमांनी प्रतिक्रियेसाठी गराडा घातला, मात्र ती नि:शब्द होती.

Back to top button