मुंबई; पुढारी वृत्तसेवा: गेल्या १२ वर्षांपासून रखडलेला कोकण महामार्ग वर्षभरात पूर्ण केला नाही, तर मुंबई बंद पाडण्याचा इशारा कोकण महामार्ग समन्वय समितीने शनिवारी (दि.४) रोजी दिला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी महामार्गाच्या ढिसाळ कामाविरोधात निषेध व्यक्त केले. यात हाताला काळ्या फिती लावाव्यात किंवा गाड्यांवर काळे झेंडे लावावे, असे आवाहनही समन्वय समितीने केले आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समन्वय समितीतर्फे राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांनी शासनाला हा इशारा दिला आहे.
या आंदोलनाची सुरुवात ५ ते ८ सप्टेंबर या काळात मानवी साखळीद्वारे शांततेच्या मार्गाने होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, कुठल्याही प्रदेशाच्या विकासात तेथील रस्त्यांचे मोठे योगदान असते.
मात्र, कोकण महामार्गाबाबत पुढील वर्षी रस्ता पूर्ण होईल, असे आश्वासन देत सुरु असलेली दिरंगाई नक्कीच संतापजनक आहे. तर केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसल्याची टीकाही द. म. सुकथनकर यांनी केली.
तसेच महामार्ग बनवणाऱ्या यंत्रणेविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्याशेजारी काळ्या फिती लावून आपला रोष व्यक्त करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलादपूर, चिपळूण, संगमेश्वर, पनवेल आणि पळस्पे याठिकाणी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत मानवी साखळी उभारली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?
पाहा : ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग