जळगाव : पीक विमा प्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा | पुढारी

जळगाव : पीक विमा प्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा :  बँक ऑफ बडोदा शाखा सावदाच्या शाखा प्रबंधकावर पीक विमा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्याला फळ पीक विम्‍याची रक्‍कम देण्यास टाळाटाळ केल्‍याने पीक विमा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करतील त्या बँकेवर गुन्हे…

यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी जे पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करतील त्या बँकेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने आज सावदा पोलीस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीक विमा योजनेबद्दल शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी

याबाबत अधिक माहिती अशी की, हवामानावर आधारित पुनर्रचीत पीक विमा योजनेबद्दल शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी आहेत. विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप शेतकर्‍यांनी केले होते. त्‍या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी गेल्या महिन्यातच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र कृषी खात्यातर्फे याबाबत दिरंगाई होत असल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत हा मुद्दा चांगलाच गाजला.

तेव्हा कृषी अधिकार्‍यांनी याबाबत लवकरच गुन्हे दाखल होतील अशी ग्वाही दिली होती. यानुसार सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर येथील प्रभारी कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन शाखा प्रबंधक नामे- राम रहीश यादव (कार्यकाळ २५/४/२०१९ ते १२/११/२०२०) बँक ऑफ बडोदा शाखा सावदा आणि शाखा प्रबंधक गणेश तळेले (कार्यकाळ दि.१३/११/२०२० ते आज पर्यंत बँक ऑफ बडोदा शाखा सावदा) यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आलेली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.३१/१०/२०१९ ते दि.११/८/२०२१ या कालावधी मध्ये शासनाचे पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना (अंबिया बहार) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. फवियो-२०१९/प्र. क्र.२०२/१०-ऐ. दि.३१/१०/२०१९ अन्वये पारीत झालेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव (लोकसेवक) यांनी पारीत केलेले आदेश क्र.जाक्र./सां/फळपिक विमा/तक्रारी/१६१७/ २०२१ जिअकृअ जळगाव दि.२५/५/२०२१ अन्वये आदेशाची अवज्ञा करण्यात आली आहे.

यामुळे राम रहीश यादव आणि गणेश तळेले यांच्या विरोधात सीसीटीएनएस गुरनं १३४/२०२१; भादंवि कलम-१८८ प्रमाणे गुन्हा नोंदिवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पाटील हे करत आहेत.

Back to top button