११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’चे आयोजन : मंत्री अमित देशमुख

अनिल देशमुख
अनिल देशमुख
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: येत्या ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका आणि वार्ड किंवा ग्राम स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम नेमके कोणते असावेत?, या कार्यक्रमांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा?, कार्यक्रमाची रुपरेषा कशी असावी?, प्रत्येक स्तरावर तो कार्यक्रम वेगळा कसा असेल याबाबतचे नियोजन पुढील बैठकीत सादर करावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोअर समितीची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक‍ न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि ऑनलाईन पध्दतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरीय कोअर समिती आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजनाची रुपरेषा ठरविणे तसेच निधीची उपलब्धता याबाबत निर्णय घेणार आहे.

यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये आजादी का अमृत महोत्सवानिमित्त "हर घर तिरंगा" हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. येत्या ११ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान महाराष्ट्रातील सर्व घरांमध्ये तिरंगा फडकवला जाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यादृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत सर्व तयारी करावी. साधारणपणे महाराष्ट्रासाठी दोन कोटी तिरंग्याची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे संविधानाचे नियम पाळून याबाबतची सर्व तयारी करण्यात यावी.

येत्या १५ ऑगस्ट रोजी मरीन ड्राईव्ह येथे आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारताची गेल्या ७५ वर्षांतील प्रगती यावर आधारीत एका विशेष लेझर शोचे आयोजन करण्यासाठी तयारी करण्यात यावी. येत्या ९ ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहांचे सदस्य यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र घेऊन एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन विधानभवनात करण्याचे नियोजन करण्यात यावे असेही यावेळी देशमुख म्हणाले आहेत.

भारत आजही कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषीबरोबरच कामगार आणि उद्योगक्षेत्राची प्रगती यांचाही समावेश या आजादी का अमृत महोत्सवात केला जावा. तसेच गावपातळीवर यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांचा समावेश व्हावा अशा सूचना कामगार मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, आज महाराष्ट्रात मधुमेह, हायपर टेन्शन आणि कर्करोग हे सर्वाधिक आजार असलेले रुग्ण दिसून येतात. त्यामुळेच आजादी का अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांमध्ये आरोग्य अभियान राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय कार्डियाक कॅथलॅब यासह आयुष्यमान हेल्थकार्डची अधिक नोंदणी यावरही भर देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत काही वसतीगृहे, शाळा आहेत. ज्या खुप ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्वाच्या आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य दोन योजनांचा समावेश आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये करण्यात याव्यात अशा सुचना यावेळी सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी केल्या.

केदार म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी सेवाग्राम आश्रम येथे शिक्षण विभागाच्या मदतीने चर्चासत्रे आयोजित करण्यात यावी, यामध्ये एनसीसी यांचाही समावेश करण्यात यावा. याशिवाय प्रत्येक जिल्हयातील एका शाळेचा ऐतिहासिक शाळा म्हणून समावेश करण्यात येणार असून, संबंधित पालकमंत्री या शाळेची निवड करतील.
आजादी का अमृत महोत्सवाचे दोन मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी कोअर समितीचे सर्व मंत्री यांच्यासह मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित सचिव यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील आठवडयात यासंबंधी विस्तृत बैठक घेतली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ १२ मार्च २०२१ रोजी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकशाही मुल्ये आणि भारतीय संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. पुढील वर्षी म्हणजे, ऑगस्ट २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वीच सर्व सरकारी पत्रव्यवहारामध्ये आझादी का अमृत महोत्सव हे संकेत चिन्ह वापरण्यात येत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news