वेबसाईट ‘हॅक’मधून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : गृहमंत्री वळसे-पाटील | पुढारी

वेबसाईट 'हॅक'मधून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : गृहमंत्री वळसे-पाटील

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :

मागील दोन दिवसांत देशातील काही वेबसाईट हॅक झाल्या आहेत. हे सत्य असल्याचे सांगत, यासंदर्भात सायबर सेलचे प्रमुख मधुकर पांडे हे माहिती घेतील. ठाणे पाेलिसांची वेबसाईटही हॅक झाली आहे; परंतु यामधून कोणताही महत्त्वाचा डेटा हॅक झालेला नाही. सध्या समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारला राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. वळसे पाटील म्हणाले, वेबसाईटही हॅक करणाऱ्या हॅकर्सने जगातील सर्व हॅकर्सना तुम्हीही यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे. वेबसाईट हॅक करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे. याबाबत राज्य सरकारकडून आढावा घेऊन तपास करण्यात येत आहे. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात यंत्रणा माहिती घेत असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सध्‍या देशात समाजासमाजामध्ये विद्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. त्याला प्रतिकार म्हणून, प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती काही समाजातील टोकाचा विचार करणार्‍या लोकांकडून होत आहे. हीबाब बरोबर नाही. शेवटी सगळ्यांना सलोख्याने रहायचं असेल तर एकमेकांच्या अडचणी व भावना समजून घेणे गरजेचे आहे. वेबसाईटही हॅक करण्‍याचे जे अपील केले जात आहे. त्यामध्ये सर्वांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर रहावे, असे आवाहनही वळसे-पाटील यांनी केले.

मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य करण्यात आले त्यासंदर्भात देशाच्या प्रमुखाने माफी मागावी ही मागणी आहे. मात्र पक्षाच्या प्रवक्त्याने जे उद्‍गार काढले त्यावरून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर कारवाई सुरू आहे. आता याबाबत काय निर्णय घ्यायचा हे देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः ठरवावे असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले. सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील याची काळजी पोलीस घेतील, असेही ते म्हणाले.

राष्‍ट्रपतीपदासाठीचा निर्णय राष्‍ट्रवादीचे वरिष्‍ठ नेतेच घेतील

पवारसाहेब राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, दिलीप वळसे पाटील म्‍हणाले, ” पवारसाहेब हे जनसामान्यांमध्ये रमणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारची जबाबदारी कितपत पटेल हे माहित नाही. शेवटी राष्ट्रपतीपदासाठीचा निर्णय पवारसाहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतीलच .”

हेही वाचा : 

Back to top button