Eknath Shinde Shivaji Park speech: स्वार्थासाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू; मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, महायुतीचाच मराठी महापौर – शिंदेंचा ठाम निर्धार
मुंबई : मराठी माणसाच्या नावाने उद्धव आणि राज ठाकरे खोटं प्रेम दाखवत आहेत. त्यांचे मराठी प्रेम हे बेगडी आहे. 20 वर्षांपूर्वी स्वार्थासाठी वेगळे झालेले दोघे आता स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. कोणाचा मायका लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. मुंबईवर महायुतीचा भगवा फडकणार आणि मराठीच महापौर होणार, त्यासाठी महायुतीच्या पाठीशी रहा, असे आवाहन शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील प्रचंड जाहीर सभेतून मुंबईकरांना केले.
सोमवारी शिवतीर्थावर झालेल्या सभेत उद्धव आणि राज ठाकरे यांनी ही पालिका निवडणूक मराठी माणसाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची असल्याचे सांगत मराठी माणसाच्या हितासाठी दोघे एकत्र आल्याचे म्हटले होते. या ठाकरे युतीचा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. शिंदे म्हणाले, हे दोघे वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणत आहेत. मग 20 वर्षांपूर्वी तुम्ही एक का झाला नाहीत? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण का केली नाही? तेव्हा तुमचा अहंकार मोठा होता. कालपरवापर्यंत एकमेकांवर काय बोलले ते जरा आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालेले तुम्ही स्वार्थासाठीच एकत्र आले आहात.उगाच मराठी माणसाच्या नावाने खोटं प्रेम दाखवत आहेत. हे पुतणा मावशीचं प्रेम आहे.
आम्ही साडेतीन वर्षांत काय केले ते पाहा. 20 वर्षांत आम्ही विचारांची भूमिका घेतली. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका करता, तुम्ही तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा त्यांना किती दान-दक्षिणा दिली होती ते सांगा, असा सवालही शिंदे यांनी केला. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही. आम्ही कार्यकर्त्यापासून पुढे आलो आहोत. आम्ही तुमचे काही घेऊन गेलो नाहीत. आम्ही मंत्रिपदावर लाथ मारून गेलो. सत्ता सोडून गेलो. त्यानंतर आमचे सरकार स्थापन झाले. मराठी माणसाच्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केले हे विसरू नका, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले.
लंडनमध्ये तुमचे घबाड आहे का?
ठाकरे वारंवार लंडनला का जातात, असा सवाल करून एकनाथ शिंदे म्हणाले, जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात ते निवडणूक संपल्यावर कुठे जातात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना मराठी माणसांशी काही घेणंदेणं नाही. मागे पहलगाममध्ये हल्ला झाला. त्यामध्ये आपले हिंदू बांधव मारले गेले. त्यात मराठी माणसंही होती. मराठी आया-बहिणींचे कुंकू फुसले गेले. तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते. या हल्ल्यानंतर या देशाचे पंतप्रधान दौरा अर्धवट सोडून परतले. पण यांनी लंडन सोडलं नाही, असे सांगत लंडनमध्ये तुमचे काही घबाड आहे का? असा सवाल शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला. आपल्याकडे त्याची सर्व माहिती आहे, पण आता बोलणार नाही, मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
काही लोकांना निवडणूक आली की फक्त मराठी माणसाची आठवण येते. एरव्ही ही लोकं मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यांना मराठीसाठी काही करावंसं वाटलंही नाही. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेवढा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे. म्हणून पाच वर्षे घरात आणि निवडणूक आली की मुंबई धोक्यात असल्याचा हे दावा करातात? असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला.
तोडायला मुंबई काय रेल्वेचा डबा आहे का?
उद्धव आणि राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचा एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. मुंबई तोडणार, मुंबई गुजरातला जोडणार म्हणतात. अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे का? कुठेही काढला आणि कुठेही जोडला? असं काही होत नाही. तुम्हीच सांगता ना, मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात आहे. पालिकेत तुमची 25 वर्षे सत्ता होती. मग हे कुणाचं अपयश आहे? सत्तेत असताना मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी तुम्ही काय केले?
आता सत्तेसाठी मराठी माणसाची शेवटची लढाई आहे असे भावनिक भाषण करता? पण मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं. उद्याही धोक्यात राहणार नाही. आता तुमचे राजकारण धोक्यात आले आहे, म्हणून तुम्हाला मराठी माणूस आठवला आहे, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.
अरे एकनाथ शिंदे काय मराठी नाही का? देवेंद्र फडणवीस मराठी नाहीत का? मुंबईतील मराठी माणसाचे महत्त्व कमी होणार नाही. त्यासाठी मुंबईचा येणारा महापौर हा मराठी असेल आणि महायुतीचाच असेल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मराठी माणूस यांच्यामुळेच मुंबईबाहेर गेला. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांला पुन्हा सन्माने मुंबईत आणल्याशिवाय महायुती सरकार स्वस्थ बसणार नाही. मुंबईकरांना रोजगार, मूलभूत सोयी-सुविधा देणं हेच आमचे मिशन आहे, असे शिंदे म्हणाले.
तुमची मुलं उद्योगपतींच्या लग्नात नाचतात
राज ठाकरे यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये अदानींना देशातील बहुतांशी उद्योग दिल्याचा आरोप केला होता. तसेच मोदी सरकारच्या काळात अदानी कसे वाढले याचे सादरीकरण केले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. मोदींनी महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले. तुमच्या राज्यात काहीच मिळाले नाही. तुम्ही कधी मागायलाही गेला नाहीत. इतका इगो होता. त्याच मोदींवर आता टीका करत आहात. अयोध्येत त्यांनी राम मंदिर बांधले. 370 कलम रद्द केले. त्यांना तुम्ही शिव्या देताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची बाळगा. गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येत आहे, असे शिंदेंनी राज आणि उद्धव ठाकरेंना सुनावले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुंबईची मोकळी मैदाने आणि भूखंड कुणी उद्योगपतींना दिली. या उद्योगपतींचे कुणाकुणाबरोबर संबंध आहेत. दीड दोन वर्षापूर्वी उद्योगपती कलानगरला कुणाच्या घरी गेले होते, बंद दाराआड चर्चा कुणाशी केली. तेच उद्योगपती नंतर शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही? ही कसली डिनर डिप्लोमसी होती. कंटेनर तुमच्या यार्डात पोहोचले नाही का? आमच्यावर तुम्ही कसले आरोप करता. यह जनता है सब जानती है. ज्यांची नावे घेता, ज्यांना जेवायला बोलावता, तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात, असा हल्लाबोल करतानाच जब चाहीए हरी पत्ती, तब याद आते है उद्योगपती, असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
ही सभा परिवर्तनाची नांदी
शिवतीर्थावरील ही सभा सभा नव्हे, तर परिवर्तनाची नांदी आहे. काल सभेत नेहमीचे टीका-टोमणे झाले. त्याची आम्हालाही आता सवय झाली आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला ही सभा नाही. मी कधी आरोपांना आरोपांनी उत्तर देत नाही. कामातून उत्तर देत आलो आहे. आम्ही भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण करणार. विकसित मुंबई हे बाळासाहेबांचे स्वप्न होते ते साकार करणार. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई तशी दिसलीही पाहिजे. मुंबईचा विकास हाच आपला अजेंडा आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होणार. तोही मराठीच असेल. महायुतीची सत्ता येणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे, असा ठाम विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी मेट्रोला स्थगिती दिली. विकास ठप्प केला. आम्ही आल्यावर विकासाला गती दिली. तुमच्या अडेलतट्टूपणामुळे मुंबईचा विकास रोखला गेले. हे विकास विरोधी लोक आहेत. मुंबईच्या प्रदूषणामुळे यांना खोकला होतो. हे बंगल्यात राहतात. पण गरिबांनी किती काळ झोपडपट्ट्या आणि नाल्याच्या बाजूला राहायचे? तुम्हाला खोकल्याचे कौतुक. पण आम्ही फिल्डवरचे कार्यकर्ते आहोत. तुमच्यासारखे घरात बसणारे नाही. अकारण आम्हाला दूषणे देता. आता यांची कामचोर टोळी निर्माण झाली आहे. ते आमची कामे चोरी करत आहेत. यांनी काही केले नाही, तर फक्त खाऊन दाखविले. कोविड बॉडी बॅग असो, कचरा असो यामध्ये खाल्ले. जेथे टेंडर तेथे सरेंडर ही यांची नीती. करून दाखविले त्याचे होर्डिंग लावले. आता खाऊन दाखविले याची होर्डिंग लावा, अशा शब्दांत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला .
सत्तेवर येताच आम्ही कोस्टल रोडला गती दिली. परवानग्या आणल्या. 20 हजार कोटी फंजिबल एफएसआय मधून दिले. तुम्ही लपूनछपून भूमिपूजन केले. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला परवानग्या आणल्या, त्यांनाही बोलावले नाही. आता आम्ही मुंबईत विकासाचे जाळे तयार करत आहोत. आम्ही मुंबईला तोडणारे नाही, तर आम्ही जोडणारे आहोत. मुंबईकरांना टोमणे मारण्यात रस नाही. मुंबईकर मुंबईला कोण काय देणार याला महत्व देईल. प्रकल्प आले नाही की हे महाराष्ट्रावर अन्याय म्हणून टीका करतात आणि प्रकल्प आला की त्याला विरोध करतात ही यांची दुटप्पी नीती आहे. आम्ही मुंबईत सत्ता आल्यास बेस्टमध्ये लाडक्या बहिणींना पन्नास टक्के प्रवासात सवलत देणार आहोत. त्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.
निवडणुकीनंतर तुम्हाला शिंदेंच्या पायाशी यावे लागेल : रामदास कदम
उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे पिल्लू आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्ही शिंदेंना मिंधे म्हणून टीका करता, पण महापालिका निवडणुकीनंतर या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या पायाशी यावे लागेल, असा हल्ला शिवसेना नेते रामदास कदम यांनी चढविला.
ते म्हणाले, निवडणुका येतात आणि जातात, पण काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वाबाबत संशय घेतला. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला तिलांजली देणारे, विचाराची बेइमानी करणारे, दिल्लीत जाऊन सोनियांच्या पायावर डोके ठेवणारे, आज आमच्यावर टीका करत आहेत हा विरोधाभास आहे. निवडणुकीनंतर तुम्ही आणि तुमचे पिल्लू बुके घेऊन पुन्हा फडणवीसांना भेटायला जाल आणि तुम्हाला एक दिवस एकनाथ शिंदेंच्या पायाशी यावे लागेल.
छत्रपतींच्या सोबत मोगलांशी लढणाऱ्या शिंदेंना तुम्ही मिंधे म्हणता. या शिंदेंच्या पायाशी तुम्हाला यावे लागेल आणि त्याची हाजीहाजी करावी लागेल. हा एकट्या एकनाथ शिंदेंचा नव्हे, तर सर्व शिंदेंचा अपमान आहे. मुंबई तोडणार, गुजरातला जोडणार ही एकच गोष्ट गेली 25 वर्षे उद्धव ठाकरे सांगत आहेत. राज ठाकरे हे तर फक्त पोपटपंची करतात. दुसरे काही करत नाहीत. यांचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी फोडले. तुम्ही पेंग्विनला निवडून दिले, वरळीत तुम्ही उमेदवार दिला नाही. पण उद्धव ठाकरेंनी तुमच्या मुलाला पाडले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काहीतरी जणाची नाही, मनाची तरी लाज बाळगावी, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला फक्त उद्ध्वस्त करण्याचे काम केले. त्याशिवाय काही केले नाही. हाच मराठी माणूस या निवडणुकीत तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणारा राहुल गांधी यांना हे आता मिठ्या मारत आहेत. त्यामुळे तुमचे हिंदुत्व तपासायला हवे. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळविली. त्यामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते. त्या गिरणी कामगारांना घरे देण्याचे काम हे तुम्ही नाही, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी केले, असे सांगतानाच दोघा ठाकरे बंधूंना धक्का देत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन कदम यांनी केले.
भाजपासोबत राहिला असतात तर धनुष्यबाण राहिला असता : रामदास आठवले
उद्धव ठाकरेंनी भाजपा सोडायला नको होते. सोबत राहायला असतात, तर तुमचा धनुष्यबाण तुमच्याकडे राहिला असता. तुम्ही राहिला नाहीत म्हणून तो एकनाथ शिंदेंकडे गेला, असे वक्तव्य आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
ज्या काँग्रेस पक्षाचा बाळासाहेबांनी विरोध केला, त्या काँग्रेससोबत तुम्ही गेलात. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हा जनतेचा कौल असताना तुम्ही सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी केली. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आले आणि ते मुख्यमंत्री झाले. आता महापालिका निवडणुकीत महायुती विजयी होईल. या महायुतीला आपल्या पक्षाचा आणि दलित समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही आठवले म्हणाले.
यावेळी आठवलेंनी शेरोशाहिरी करत उद्धव ठाकरेंना टोले लगावले. महायुतीची येणार आहे सत्ता, ठाकरे बंधूंचा उडून जाणार आहे पत्ता, असे आठवले म्हणाले.
महायुतीचा विजय आहे पक्का
आमच्या सर्वांचा मान तुम्हीं राखा
भरून गेला आहे शिवाजी पार्क
महायुतीला देतो 150 मार्क
ठाकरे बंधूंना देतो 40 मार्क
काँग्रेसला देतो 30 मार्क
असे सांगत रामदास आठवले यांनी महायुतीच्या 150 जागा निवडून येतील, असा दावा केला.

