

Ladki Bahin Yojana
मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आदर्श आचारसंहिता लागू असताना या योजनेचा नियमित किंवा प्रलंबित (थकीत) लाभ देण्यास आयोगाने संमती दिली असली, तरी जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम (Advance) स्वरुपात देण्यास मात्र स्पष्ट शब्दांत मज्जाव केला आहे.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये खात्यात जमा केले जातील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या 'मकर संक्रांत भेटी'वरून राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आयोगाने मुख्य सचिवांकडून शासनाच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण मागवले होते.
मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते की, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ज्या योजना किंवा विकासकामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत, ती आचारसंहिता काळात सुरू ठेवता येतात. मात्र, आयोगाने यावर स्पष्ट भूमिका घेताना खालील अटी घातल्या आहेत:
नियमित लाभ सुरू राहणार: ज्या महिला आधीच लाभार्थी आहेत, त्यांना त्यांचा मासिक हप्ता किंवा थकीत रक्कम मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
अग्रिम लाभाला बंदी: जानेवारी महिना संपण्यापूर्वीच त्याचा लाभ 'अग्रिम' किंवा 'ॲडव्हान्स' म्हणून देता येणार नाही.
नवीन नोंदणी थांबवली: आचारसंहिता काळात नवीन लाभार्थी निवडता येणार नाहीत किंवा त्यांची नावे यादीत समाविष्ट करता येणार नाहीत.