Ajit Pawar on Devendra Fadnavis: मी कामाचा माणूस… फडणवीसांच्या टीकेनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar on Devendra Fadnavis
मुंबई : रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरीजा ओक यांनी त्यांची मुलाखत घेत त्यांना तमाम पुणेकरांच्या मनातील प्रश्न विचारले. त्यात फडणवीस यांनी सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. या मुलाखतीत फडणवीस यांनी "अजित पवार फक्त बोलतात, माझ काम बोलतं" अशी टीका केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला आज अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आज 'पुढारी न्युज'ने अजित पवार यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी ते म्हणाले की, "फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय बोलायच हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की अजित पवार कामाचा माणूस आहे की कसा."
फडणवीस काय म्हणाले होते?
मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकांवर टीका करू नये. मी आतापर्यंत तो संयम पाळलाय. मात्र त्यांचा संयम थोडा सुटलाय. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून अजित दादांचा संयम जरा कमी झालेला मला वाटतोय. पण १६ जानेवारी नंतर ते असे बोलणार नाहीत, असा फडणवीसांनी टोला लगावला होता.
लोकांचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी सांगा
मेट्रोचे तिकीट मोफत करण्याच आश्वासन अजित दादा देत आहेत, ते शक्य आहे का? यावर मुख्यमंत्री मिश्कीलपणे हसत म्हणाले, मी एक घोषणा आज करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमान आहेत. त्यामध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या जाहीरनाम्यामध्ये काहीही म्हणतो.
माझं म्हणणं आहे किमान लोकांचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी सांगितल्या पाहिजे. मेट्रो हे काय एकट्या राज्याचे नाही. केंद्राचे देखील आहे. जी मेट्रोची बॉडी असते त्याचे अध्यक्ष हे केंद्रीय सचिव असतात आणि एमडी हे महाराष्ट्रातले असतात. मेट्रोला ज्यावेळेस दररचना करायची असते त्यासाठी दर पुर्नरचना समिती (रेट फेरफिक्सेशन कमिटी) निर्णय घेते. ते बदलण्याचे अधिकार मला देखील नाहीत.
आगामी ५ वर्षात 'मनपा' च्या वतीने शहरात ४४ हजार कोटींची कामे होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा रोडमॅप रविवारी रात्री पुणेकरांसमोर मांडला. मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, आगामी पाच वर्षांत पुणे महापालिकेच्या वतीने तब्बल ४४ हजार कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. तसेच केंद्र सरकारकडून ३३ हजार कोटींची स्वतंत्र कामेही होत आहेत. त्यामुळे स्वच्छ पर्यावरण तुम्ही काही वर्षात अनुभवू शकाल. शहरातील गुंडगिरी मोडून काढत भयमुक्त वातावरण दिले जाईल, असे पुणेकरांना आश्वस्त केले.

