

चेन्नई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते के. अण्णामलाई यांनी सोमवारी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मनसेप्रमुखांना आपल्याला मुंबईत येण्यापासून रोखून दाखवण्याचे आव्हान त्यांनी दिले. राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांचा उल्लेख रसमलाई असा करत, त्यांना मुंबईच्या मुद्द्यांवर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल उपस्थित केला होता; त्याला अण्णामलाई यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, मला धमकावणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्यांनी फक्त मला शिव्या देण्यासाठी सभांचे आयोजन केले आहे. मी इतका महत्त्वाचा झालो आहे का, हे मला माहीत नाही, असे अण्णामलाई म्हणाले.
अण्णामलाई आणि महाराष्ट्रातील ठाकरे बंधू यांच्यातील राजकीय संघर्ष आता वैयक्तिक आव्हानापर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘मला मुंबईत येऊ न देण्याची भाषा करणारे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे मला धमक्या देणारे नक्की आहेत तरी कोण?’ असा जळजळीत सवाल करत अण्णामलाई यांनी मुंबईच्या राजकीय मैदानात शड्डू ठोकला आहे. ‘मी मुंबईत आल्यावर माझे पाय कापण्याची भाषा करणाऱ्यांनी आपली हिंमत प्रत्यक्ष मैदानात उतरून दाखवावी,’ असे थेट प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.
मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ती भारताची आर्थिक नाडी आणि जागतिक दर्जाचे शहर आहे, याकडे अण्णामलाई यांनी लक्ष वेधले. ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले, ‘मुंबई ही आपली जागतिक ओळख आहे. हे शहर आपल्याच देशातील एका राज्यात असताना, महाराष्ट्रातील सामान्य कष्टकरी जनतेचा या विकासात वाटा नाही का? मुंबईवर सर्वांचा अधिकार आहे. जे लोक केवळ प्रादेशिक वादाचे राजकारण करून अडथळे निर्माण करत आहेत, ते पूर्णपणे अडाणी आहेत.’
मुंबईतील दाक्षिणात्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी अण्णामलाई यांनी सुरू केलेल्या दौऱ्यांमुळे ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून अण्णामलाई यांना मुंबईत पाय ठेवू न देण्याचा इशारा स्थानिक नेत्यांनी दिला होता. मात्र, अण्णामलाई यांनी या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत थेट ठाकरे घराण्यातील दोन युवा नेत्यांनाच लक्ष्य केले आहे.
अण्णामलाई यांच्या या विखारी टीकेनंतर अद्याप मातोश्री किंवा शिवतीर्थावरून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. अण्णामलाई यांच्या या 'ओपन चॅलेंज'मुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतांच्या ध्रुवीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.