

मुंबई : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील तरुणांना अर्थसाहाय्य मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी 13 हजार 847 तरुण नवउद्योजक तयार झाले आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, हे सर्व उद्योजक 18 ते 45 वयोगटातील आहेत.
राज्याच्या उद्योग विभागाने नवीन औद्योगिक धोरणांतर्गत अनेक नावीन्यपूर्ण योजना व कार्यक्रम हाती घेतले आहेत. सूक्ष्म व लघू उद्योग उपक्रमांना चालना, तसेच स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम या योजनेनुसार तरुणांना अर्थसाहाय्य केले जात आहे, अशी माहिती उद्योग विभागातील अधिकाऱ्याने दिली .
राज्यातील युवक व युवतींना आर्थिक बळ देऊन स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी 50 लाख व सेवा कृषीपूरक उद्योग आणि व्यवसाय प्रकल्पांसाठी वीस लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. प्रकल्पांची आर्थिक पाहणी तपासून बँका कर्ज देण्याबाबत निर्णय घेतात. योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या अर्जदारांसाठी शासनमान्य संस्थांच्या सहयोगाने मोफत उद्योजकीय प्रशिक्षण दिले जाते. 2024-2025 या वर्षात 13 हजार 847 नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
(संख्या : 12 जानेवारी 2026 अखेर)
मुंबई 40, मुंबई उपनगर 213, पालघर 341, रायगड 466, रत्नागिरी 625, सिंधुदुर्ग 263, ठाणे 266, कोल्हापूर 1,496, पुणे 372, सांगली 629, सातारा 366, सोलापूर 370, छत्रपती संभाजीनगर 426, बीड 216, जालना 236, धाराशिव 522, हिंगोली 554, लातूर 670, नांदेड 280, परभणी 293, अहिल्यानगर 414, धुळे 194, जळगाव 331, नंदुरबार 108, नाशिक 615, अकोला 348, अमरावती 642, बुलडाणा 397, वाशिम 250, यवतमाळ 254, भंडारा 320, चंद्रपूर 444, गडचिरोली 174, गोंदिया 229, नागपूर 330, वर्धा 253.