रेल्वे रुळांशेजारी १५० एकरांवर बहरणार फुलबागा, मध्य रेल्वेचा निर्णय | पुढारी

रेल्वे रुळांशेजारी १५० एकरांवर बहरणार फुलबागा, मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे रुळांशेजारी सांडपाण्यावर होणार्‍या भाजीपाल्याच्या लागवडीवर बंदी घालून फुलझाडे लावण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रुळांशेजारी 113 ठिकाणी सुमारे 150 एकर जमिनीवर फुलझाडे लावण्याच्या प्रकल्पाच्या निविदा काढण्यात आल्या असून, मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा, कर्जत आणि पनवेलदरम्यान रुळांच्या शेजारी हजारो एकर जमीन आहे. अतिक्रमण होऊ नये यासाठी ‘ग्रो मोअर फूड’ योजनेंतर्गत रेल्वे कर्मचार्‍यांना भाजीपाला पिकवण्यासाठी ही जागा वार्षिक शुल्क आकारून दिली जाते. या रिकाम्या जागेवर पालक, मुळा, भेंडी आदी भाज्यांची लागवड केली जाते; मात्र पाण्याची सोय नसल्याने चक्क सांडपाण्याचा वापर केला जातो. परिणामी हा भाजीपाला मानवी आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो.

या पार्श्‍वभूमीवर मुंबई विभागात रेल्वे रुळांशेजारी भाजीपाल्याऐवजी फुलझाडे लावण्याची मागणी होत होती. त्यानुसार मध्य रेल्वेने फुलबागा फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचे कंत्राट मिळवणारी कंपनीच फुलझाडे लागवडीचा खर्च करणार आहे. रेल्वेमार्गाशेजारी फुलबागा फुलवण्याच्या प्रकल्पासाठी मध्य रेल्वेने बुधवारी बोलीपूर्व बैठक घेतली.

यात सह्याद्री फार्म पॅरामाऊंट एंटरप्राईझ व अन्य सहा इच्छुक कंपन्या उपस्थित होत्या.स्वारस्य अभिव्यक्ती सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. या प्रकल्पामुळे रुळांच्या शेजारी घाणीचे साम्राज्य राहणार नसून, प्रवाशांंना रंगीबेरंगी फुलझाडे दिसतील, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

दरम्यान, मध्य रेल्वेने मार्च ते सप्टेंबर या कालावधीत ठाणे ते मुंब्रा स्थानकांदरम्यान (पारसिक बोगद्याजवळ आणि आजूबाजूचा परिसर) 200 टनापेक्षा जास्त कचरा उचलला आहे.
कोरफड लागवडीसाठी हवी परवानगी

सुरुवातीला या प्रकल्पात गुलाब आणि झेंडूची लागवड केली जाईल. मात्र, सहभागी कंपन्यांनी कोरफडसारख्या औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही परवानगी हवी आहे.

येथे होणार लागवड

कळवा-मुंब्रा : 12 एकर, परळ-दादर : दीड एकर, घाटकोपर-विक्रोळी : दोन एकर, नाहूर-मुलुंड : दीड एकर, मुलुंड -ठाणे : दोन एकर, ठाकुर्ली पॉवर हाऊस व कल्याण यार्डसह ठाकुर्ली ते कल्याण : 10 एकर, ऐरोली-घणसोली, टिळक नगर, मानखुर्द -वाशी, कुर्ला गुड्स शेड, ठाणे- तुर्भे, गुरू तेग बहादूर नगर, कुर्ला कार शेड, कळवा यार्ड, दिवा-डोंबिवली, वडाळा रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस, सायन-कुर्ला, नेरुळ-सीवूड्स, कुर्ला-घाटकोपर, कल्याण-शहाड,अंबरनाथ-बदलापूर.

Back to top button