जितेंद्र आव्हाड : म्हाडाची भरती परीक्षा दोनदा होणार | पुढारी

जितेंद्र आव्हाड : म्हाडाची भरती परीक्षा दोनदा होणार

मुंबई/ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेणार्‍यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी म्हाडाच्या भरती परीक्षा ही पूर्व परीक्षा गृहीत धरण्यात येणार असून त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली.

आरोग्य भरतीमधील पेपरफुटीवरून राज्यात वादंग माजले असतानाच आता म्हाडामधील नोकर भरतीसाठी दलालांकडून पैसे घेतले जात असल्याची चर्चा आहे. परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांकडून पैसे घेऊन नोकरी लावणार्‍या दलालांचे रॅकेट सक्रिय झाल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्याकडे आल्या.

म्हाडाच्या परीक्षा देणार्‍या परीक्षार्थींनी नोकरीसाठी पैसे मोजावे लागणार म्हणून कर्ज काढले, जमिनी विकल्या, काहींनी तर मंगळसूत्रे गहाण ठेवून दलालांना पैसे दिले आहेत. तशी माहिती गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्याकडे येताच त्यांनी परीक्षेचा पॅटर्न बदलून टाकला. लवकरच होणार्‍या परीक्षेचे रूपांतर पूर्व परीक्षेत करून पुन्हा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला. या परीक्षा पॅटर्नमुळे पैसे देणार्‍या आणि घेणार्‍यांचे हेतू साध्य होणार नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

म्हाडाच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनो, तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल अशा शब्दांत आव्हाड यांनी सर्व परीक्षार्थींना आश्‍वस्त केले.

पैसे परत करा

ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मुलं-बाळं कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरिबाचे शाप घेऊ नका, कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी रविवारी रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत.
– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

Back to top button