लोकसभा निकालानंतरही त्‍यांना शहाणपण आलं नाही : शरद पवारांचा महायुतीला टोला | पुढारी

लोकसभा निकालानंतरही त्‍यांना शहाणपण आलं नाही : शरद पवारांचा महायुतीला टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारले आहे. तरीही त्यांना शहाणपण आलेले नाही.  सत्तेचा सरळ-सरळ गैरवापर केला जात आहे.  येणाऱ्या तीन चार महिन्यानंतर जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांमध्‍ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्‍लाबाेल केला.  आज (दि.१५)  महाविकास आघडीच्‍या वतीने  आयाेजित  पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

जातीय जनगणना करण्‍यावर आमच्‍यामध्‍ये एकमत

लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीची आज (दि.१५) पहिल्यांदाच पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार म्‍हणाले की, लाेकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रातील जनतेने भाजपला नाकारले आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीत जनताच त्‍यांना पुन्‍हा उत्तर देईल. देशात जातीय जनगणना करण्‍यावर आमच्‍यामध्‍ये एकमत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले,” जिथे पंतप्रधानांचा रोड शो आणि रॅली झाली तिथे आम्ही जिंकलो. त्यामुळे पंतप्रधानांचे आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो.”

आगामी विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढविणार

लोकसभा निवडणूक निकालावरुन  ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणूक संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आगामी विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढविणार आहे. जनतेच्या कोर्टात शिवसेना कोणाची आहे याचा आता फैसला  झाला आहे.” पुढे बोलत असताना ते म्हणाले, ” तपास यंत्रणांचा गैरफायदा घेतला जात आहे. भाजपचा फोलपणा महाराष्ट्राने या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून  दिला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्म, जातींनी मतदान केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेेने लोकशाही वाचवली आहे. महाराष्ट्र जनतेचे आम्ही आभार मानतो. भाजपने ४०० पारचा नारा दिला होता. त्याचे काय झाले? अच्छे दिनच्या कथनाचे काय झाले, मोदींच्या हमीभावाचे काय झाले? असे सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले,” महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आणि सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेने एमव्हीएच्या उमेदवारांना विजयी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच, आज महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आम्ही सर्वजण लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्हाला, विधानसभा निवडणुकीतही तेच प्रेम मिळेल आणि आता महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button