राज्यात 11 मतदारसंघांत आज ‘हायव्होल्टेज’ लढती | पुढारी

राज्यात 11 मतदारसंघांत आज ‘हायव्होल्टेज’ लढती

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी राज्यात मंगळवारी (दि. 7) मतदान होत आहे. बारामती मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजय यांच्या लढतीत मतदार कोणाला पसंती देतात, याचा फैसलाही होणार आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार प्रणिती शिंदे, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आदींची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

राज्यात पाच टप्प्यांत मतदान होणार असून, 7 मे रोजी तिसरा टप्पा पार पडत आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, बारामती, माढा, सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, लातूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. या मतदारसंघांचा प्रचार रविवारी थंडावला होता. राज्यात उन्हाचा पारा चढला असताना, राजकीय पारा चढलेल्या बारामतीसारख्या मतदारसंघात या टप्प्यात निवडणूक होत आहे.

बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात अटा-तटीचा सामना रंगला आहे. या लढतीत बारामतीकर कोणाच्या बाजूने कौल देतात, हे आता स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लढतीकडे राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे आणि ‘उबाठा’ शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्यात चुरशीची लढत होत आहे. तळकोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ‘उबाठा’ गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यातही जोरदार लढत रंगली होती. या लढतीत कोणाच्या बाजूने मतदार कौल देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सातार्‍यामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना ‘उबाठा’ शिवसेनेचे चंद्रहार पाटील की अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे लढत देतात, याचाही फैसला मतदार करणार आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपला रामराम केल्याने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे गणित ऐनवेळी बदलले. सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते या दोन विद्यमान आमदारांमध्ये सामना रंगला आहे, तर माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे कडवे आव्हान आहे. या दोन्ही मतदारसंघांत मतदार कोणाला साथ देतात, याबाबत राज्यात उत्सुकता आहे.

धाराशिव मतदारसंघात खासदार ओमराजे निंबाळकर यांना पराभूत करण्याचे आव्हान माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यासमोर आहे. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यात अनेक महत्त्वाच्या लढती असल्याने राज्यात किती मतदान होते, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी नेत्यांनी आपली कंबर कसली आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Back to top button