सांगलीबाबत उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस नेत्यांना फोन | पुढारी

सांगलीबाबत उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस नेत्यांना फोन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने व शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हे उमेदवारी अर्ज भरत असताना विश्वजित कदम यांनी याकडे पाठ फिरविल्याने शिवसेना नेतृत्व चिंतीत झाल्याचे वृत्त आहे. सांगलीत काँग्रेस नेत्यांना शिवसेनेच्या उमेदवाराचे मनापासून काम करायला सांगण्यासाठी व पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी शिवसेनेचे नेतृत्व आता दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधू लागल्याचे वृत्त आहे. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसचे बंड थंड व्हावे, यासाठी शिवसेना नेतृत्व व दिल्लीतील काँग्रेसचे पक्ष श्रेष्ठी यांच्यात संवाद सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात असले, तरी दोन्ही पक्षांकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या तरी भाजपतर्फे खासदार संजय पाटील, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील, असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र आहे.

मतदानाची तारीख जवळ येत असतानाच काँग्रेसनेही अजूनही आशा सोडली नसून विविध नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना गळ घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी बाळासाहेब थोरात यांनी सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, तेथील काँग्रेसची परंपरा पाहता आणि येथे ठाकरेंचा एकही आमदार, नगरसेवक नसल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, या बद्दल काँग्रेसचे स्थानिक नेते आग्रही आहेत.

पडद्याआडून मदतीची रणनीती?

विशाल पाटील यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेण्याचे काँग्रेस नेतृत्वाने ठरविले आहे. त्यांना पडद्याआडून मदत करायची, अशी रणनीती काँग्रेसची असून, त्याला पक्ष श्रेष्ठींची मूक संमती असल्याचे कळते. महाविकास आघाडीत सांगलीची जागा शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गेल्यानंतर काँग्रेसने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. उत्तर मुंबईची जागा शिवसेनेने घ्यावी आणि सांगलीची काँग्रेसला सोडावी, असा प्रस्तावही काँग्रेसतर्फे शिवसेनेला दिला गेला आहे. चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने विधानसभेत संधी द्यावी व तेव्हा काँग्रेस पूर्ण सहकार्य करेल, अशी हमीही काँग्रेसतर्फे शिवसेनेला दिली गेल्याची चर्चा आहे.

Back to top button