गुरुपुष्यामृत : आज होणार सोन्याची लूट | पुढारी

गुरुपुष्यामृत : आज होणार सोन्याची लूट

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी, लक्ष्मीपूजन, धनोत्रयदशी, अक्षय्यतृतीया या मुहुर्ताप्रमाणेच सुवर्ण खरेदीसाठी महत्वाचा मानला जाणारा गुरुपुष्पामृत योग गुरुवारी जुळून येत आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात तोळ्यामागे 500 ते 1000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता असली तरी या दिवशी मुंबईत सुमारे 40 टन म्हणजेच 400 ते 450 कोटींच्या सोन्याची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला मुंबईत 400 कोटी तर राज्यात 550 कोटी असे एकूण 950 कोटींचे सोने विक्री झाले होते. विशेष म्हणजे नववर्षदिनी सोन्याचा दर तोळ्यामागे 500 रुपयांनी वाढून 63 हजार रुपयांवर पोहोचूनही विक्रीत वाढ झाली होती.

त्यानंतर बुधवारी 21 फेब्रुवारीला सोन्याचा दर 63,700 रुपये तोळ्यावर पोहोचला होता. तर 3 टक्के जीएसीटी मिळून एक तोळे सोने 65,500 रुपयांना विकले गेले. गुरुवारी हा दर आणखी वाढेल अशी शक्यता इंडिया ब्युलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी ‘पुढारी’ जवळ व्यक्त केली. गेल्या वर्षभरात 70 हजार टन सोन्याची मुंबई सराफ बाजारात व्रिकी झाल्याचेही जैन यांनी सांगितले. गुरुवारी मुंबईत 40 टन तर राज्यात सोन्याची विक्री अपेक्षित असल्याचे जैन म्हणाले.

घर, जागा, जमीन-जुमल्यानंतर सोन्याकडे कल

सोलापूर : अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल कमी होत
आहे. घर, जागा, जमीन-जुमला, वाहने, पर्यटन या अत्यावश्यक गरजा भागल्यानंतर सोन्याला प्राधान्य देण्यात येत आहे. गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर सोने-चांदी खरेदीवर भर दिला जाणार असला तरी गेल्या काही दिवसांत वाढती महागाई, बदललेले जीवनमान, आरोग्य, शिक्षणासह अत्यावश्यक निवार्‍याला लोकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते.

Back to top button