Raj Thackeray : लोकसभेला मनसे स्वबळावर? | पुढारी

Raj Thackeray : लोकसभेला मनसे स्वबळावर?

मुंबई : नरेश कदम : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीगाठी सुरू असल्या तरी मनसेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले असून, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक या लोकसभेच्या मतदारसंघांत मनसे आपले उमेदवार उतरवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेटीगाठी वाढल्या होत्या. तेव्हा मनसेला सोबत घेण्याची चर्चा भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली होती. उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेण्याची रणनीती भाजपच्या धुरिणांनी आखली होती. राज यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जात होते. राज यांचे महत्व वाढविले जात होते. शिंदेंसोबत शिवसेनेचे खासदार आणि ४० आमदार फुटले असले तरी संघटनेत मोठी फूट पडलेली नव्हती. त्यामुळे मनसेची ताकद असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथे त्यांना थेट महायुतीत घेण्याचे किंवा त्यांच्याशी काही जागांची तडजोड करण्याचे भाजपने ठरविले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यामुळे मनसेला थेट महायुतीत घेण्याचा प्रस्ताव बारगळला आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक लाखांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यामुळे तेव्हा शिवसेनेला मोठा फटका बसला होता. मात्र तेव्हाचा मनसेचा बहर आता उरलेला नाही. संघटनेचे अस्तित्व आहे. काही भागात ताकद आहे. परंतु लोकसभेची जागा जिंकेल अशी परिस्थिती नाही. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळे ही जागा ते लढविणार आहेत. दक्षिण मध्य मुंबईत दादर माहीम भागात त्यांची ताकद आहे. त्यामुळे ही लोकसभा ते लढविणार आहेत. पण या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार आहेत. शेवाळे आणि मनसेचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मनसेचा उमेदवार हा शेवाळे यांच्यासाठी फायदेशीर ठरेल का, हे बघावे लागेल. ठाणे, आणि कल्याणमध्ये महायुती आणि मनसेची मैत्रीपूर्ण लढत असेल का? येथे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असतील, त्यामुळे या लढती रंगतदार असतील.

आता जेथे उद्धव ठाकरे यांची व्होट बँक फोडता येईल किंवा त्यांच्या मतांची विभागणी होईल, अशा ठिकाणी भाजप आणि शिंदे गट मनसेशी तडजोड करणार आहे. महायुतीत जागावाटपाची मारामारी असल्याने मनसेने स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. यात मनसेने ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक या लोकसभेच्या जागा लढविण्याचे ठरविले आहे.

Back to top button