ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल | पुढारी

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा आणि अन्य चौघांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावातील जमिनीवर वायकरांनी दोन लाख चौरस फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात केली. या हॉटेलची किंमत 500 कोटी रुपये इतकी आहे. बागेचे आरक्षण दाखवून चार कोटी रुपये रेडीरेकनर मूल्याचा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला गेला. भूखंडावरील 33 टक्के जागेवर वायकर यांनी हॉल बांधला. गेली अनेक वर्षे या जागेवर लग्न, पार्टी, असे अनधिकृत व्यवहार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवर अनधिकृत कब्जा करून बांधकाम करत मातोश्री स्पोर्टस् ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने वायकर यांनी 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. मुंबई महानगरपालिकेतील सहायक अभियंता संतोष मांडवकर यांच्या फिर्यादीवरून वायकर दाम्पत्यासह त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि वास्तुविशारद अरुण दुबे यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Back to top button