राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये ध्वजारोहणावरून नाराजी | पुढारी

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये ध्वजारोहणावरून नाराजी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या जिल्ह्याऐवजी इतर जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचे आदेश दिल्यावरून विशेषत: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पुणे जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यास न सांगता कोल्हापूरला जाण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत; तर छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी अमरावतीला पाठवले आहे.

राज्यात शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. मंत्रीमंडळाचा पूर्णतः विस्तार झालेला नाही. त्यासाठी पालकमंत्री नसलेल्या ठिकाणी काही मंत्र्यांना ध्वजारोहणासाठी पाठविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तर काहींना पालकमंत्री पद असताना त्यांना दुसर्‍या जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी पाठविण्यात येणार आहे. दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री असताना त्यांना धुळे येथे झेंडावंदन करण्याची ऑर्डर काढली आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यामुळे पाटील हे रायगडला ध्वजारोहण करणार आहेत. उदय सामंत रायगडचे पालकमंत्री असल्यामुळे या जिल्ह्यातील मंत्री आदिती तटकरे यांची पालघरला ध्वजारोहण करण्याची ऑर्डर निघाली आहे. अनेक मंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्यामुळे याबाबतचे आदेश रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोणीही नाराज नसून ठरलेल्या ठिकाणी मंत्री ध्वजारोहण करतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Back to top button