म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडतीसाठी अर्ज भरण्यास १० जुलै पर्यंत मुदतवाढ | पुढारी

म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडतीसाठी अर्ज भरण्यास १० जुलै पर्यंत मुदतवाढ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यास १० जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मात्र सोडतीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. आतापर्यंत म्हाडाकडे ७५ हजार ६८३ अर्ज आले असून त्यापैकी ५१ हजार ५६३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. १० जुलै पर्यंत एक लाख पात्र अर्ज नोंदवले जातील,अशी म्हाडाला अपेक्षा आहे.

मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यास २२ मे पासून सुरुवात झाली आहे. अर्जदार १० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. तर रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील. १७ जुलै रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. यादी प्रसिद्ध झाल्यापासून १९ जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. २४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे.१७९५ सदनिका म्हाडा योजनेतील , विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत १३९ , विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या ७५ , विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत २५ सदनिका आणि १०२ विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७९०, अल्प उत्पन्न गटासाठी १०३४, मध्यम उत्पन्न गटासाठी १३९ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिका आहेत.

अत्यल्प उत्पन्न गटाकरिता वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत, अल्प उत्पन्न गटाकरिता नऊ लाख रुपयापर्यंत, मध्यम उत्पन्न गटाकरिता बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा आहे.उच्च उत्पन्न गटाकरिता कमाल उत्पन्न मर्यादा नाही. अर्ज करतेवेळी अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

 महागडी घरे कळीचा मुद्दा

यंदाच्या सोडतीतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत.त्यामुळे सोडतीसाठी अपेक्षित प्रमाणावर अर्ज न आल्याचे चित्र आहे.मात्र यंदा सोडत नोंदणीची पद्धत बदलल्याने फक्त पात्र अर्जाचा आकडेवारीत समावेश करण्यात आला आहे.यापूर्वी लोक सरसकट अर्ज करत.त्यामुळे अर्जाची संख्या जास्त दिसे.मात्र यातील अनेक अर्ज छाननी नंतर बाद ठरत,असा म्हाडाचा युक्तिवाद आहे.

Back to top button