मुंबई तुंबल्यास अधिकाऱ्यांना नारळ द्या : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

मुंबई तुंबल्यास अधिकाऱ्यांना नारळ द्या : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नाल्यातून किती गाळ काढला व त्याच्या टक्केवारीशी मला काही देणे-घेणे नाही. नाल्याच्या तळापर्यंत सफाई झालीच पाहिजे. यंदा पावसाळ्यात पाणी तुंबले तर अधिकाऱ्यांच्या हातात नारळ द्या, जर पाणी तुंबले नाही तर शाल-श्रीफळ देऊन सत्कार करा, असा सल्लावजा दमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना भरला.

मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले. नालेसफाईच्या पाहणीसाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार याची माहिती मिळताच पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने कंत्राटदाराची यंत्रणा ते जेथे भेट देणार तेथे तैनात केली होती. मिठी नदीच्या एकाच ठिकाणी तब्बल ८ पोकलेनद्वारे सफाई सुरू असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरवताच नाले सफाईची कामे पुन्हा ठप्प पडली.

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दुपारी ३.३० वाजता पहिली भेट मिठी नदीवर दिली. मुख्यमंत्री येण्याअधीच आयुक्तांसह सर्व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते. त्यावेळी मिठी नदीत तराप्यावर ३ पोकलेन तर नदीच्या किनाऱ्यावर ५ पोकलेन तैनात करण्यात आले होते. मुख्यमंत्री येताच हे आठही पोकलेन गाळ उपसू लागले. नदीकिनारी सुमारे १५ मिनिटे मुख्यमंत्री नदीतील गाळ उपसण्याची पाहणी करत होते. मुख्यमंत्री परतीला निघताच सर्व कामे ठप्प पडली. बांद्रा-कुर्ला संकुलाच्या पुलावरही मुख्यमंत्र्यांना नेण्यात आले. त्यानंतर दादर येथील प्रमोद महाजन उद्यान व अखेरीस लव्ह ग्रोह पंपिंग स्टेशन येथे मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.

Back to top button