आता नववी ते बारावी चार वर्गांचे ‘क्लस्टर’ | पुढारी

आता नववी ते बारावी चार वर्गांचे ‘क्लस्टर’

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  इयत्ता नववी ते बारावी असे चार वर्गांचे क्लस्टर तयार करताना नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात तब्बल आठ विद्या शाखा निर्माण करण्यात आल्या असून, अकरावी आणि बारावीला प्रत्येकी आठ विषय निवडता येतील. अकरावीला निवडलेले विषय बारावीला कायम राहतील. यात विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्याने कला, विज्ञान आणि वाणिज्य या प्रचलित शाखा मोडीत निघाल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. अकरावी-बारावीला निवडण्यात येणार्‍या आठपैकी चार विषय हे एकाच विद्या शाखेचे निवडणे बंधनकारक असेल आणि त्यावरच त्या विद्यार्थ्याचा पुढील प्रवास निश्चित होईल, असे जाणकार सांगतात.

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना संस्थेने (एनसीएफ) हे बदल सुचवले आहेत. देशातील अभ्यासक्रमांसाठी प्रथमच नवी रचना तयार करण्यात येत आहे. नववी ते बारावीच्या परीक्षांबाबतच्या दूरगामी परिणामकारक शिफारशी या आराखड्यात आहेत. या शिफारशी लवकरच सार्वजनिक करण्यात येतील. नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यावर विचार करून नव्या परीक्षा रचना आणि अभ्यासक्रमावर शिक्कामोर्तब होईल आणि 2024 पासून ही नवीन शैक्षणिक पद्धती लागू करण्याचा विचार केंद्र सरकारचा आहे. पुढारी प्रतिनिधीने यासंदर्भात उच्च शिक्षण विभागातील जाणकारांशी चर्चा करून घातलेली नवी शिक्षणपद्धती जाणून घेतली व विद्यार्थी-पालकांत निर्माण झालेले अनेक संभ्रम दूर होतील, अशी उत्तरे मिळवली.

शाखा असणार की नसणार?

कला, विज्ञान, वाणिज्य या शाखा मोडीत निघाल्याची चर्चा आहे. दहावीनंतर कोणत्या शाखेला जायचे ही दरवर्षी घराघरांत होणारी चर्चा आता बंद होईल. नव्या धोरणानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान ही विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही. नव्या धोरणात आठ विद्या शाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसमोर आठ विषय निवडण्यासाठी 16 विषयांचे पर्याय असतील. निवडलेल्या आठ विषयांत किमान 4 विषय एकाच विद्या शाखेतले निवडणे बंधनकारक असेल. हे एका विद्या शाखेतील चार विषय त्या विद्यार्थ्याचा पुढील शैक्षणिक प्रवास निश्चित करतील आणि त्याचे करिअरही हेच विषय कदाचित ठरवू शकतील.

विषय कसे निवडणार?

विद्यार्थ्याला अकरावी आणि बारावी या दोन वर्षांत बोर्ड परीक्षा देताना वेगवेगळ्या 16 अभ्यासक्रमांचे पर्याय असतील. चार टप्प्यांत विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम निवडावे लागतील. उदाहरणार्थ, समाजशास्त्र शाखा निवडल्यास त्यात एक अभ्यासक्रम निवडावा लागेल. इतिहास विषय निवडल्यास विद्यार्थ्याला त्या विषयाचे चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र विषय निवडल्यास भौतिकशास्त्राचे चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. गणित शाखा निवडल्यास त्यातील चार अभ्यासक्रम पूर्ण करावे
लागतील. चौथा विषय या तीन विद्या शाखांपैकी किंवा पूर्णपणे वेगळे विषय निवडता येतील.

बहुविद्याशाखीय शिक्षण

नव्या अभ्यासक्रमात बहुविद्याशाखीय आणि सर्वांगीण शिक्षणावर भर दिला जाणार असून, अकरावी व बारावीच्या वर्गांची केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये विभागणी केली जाणार नाही. वेगवेगळ्या विद्या शाखांचे ज्ञान एकत्रित घेता यावे म्हणून कला किंवा मानव्यविद्या, विज्ञान, वाणिज्य आणि क्रीडा या विद्या शाखांचा समावेश असलेला बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.

परीक्षा दोन वेळा…

अकरावी आणि बारावीचे वर्ष आणि परीक्षा सत्र पद्धतीनुसार घेण्यात येतील. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे महत्त्व पूर्वीसारखे राहणार नाही. नववी ते बारावीचे शिक्षण एकसंध असण्यावर भर दिला आहे. परीक्षा दोन भागात घेतल्या जातील. एक परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची, तर दुसरी वर्णनात्मक प्रश्नांची असेल. सत्र पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येतील. विद्यार्थी आवडीचे अभ्यासक्रम निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील. अंतिम निकालात त्यापूर्वीच्या अनुक्रमे नववी व अकरावीतील गुणांचाही विचार केला जाणार आहे.

आव्हाने काय असतील…

  • परीक्षा देताना 16 विविध विषय निवडण्याची मुभा असल्याने त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून परीक्षेला सामोरे जातील, नवी पद्धत आणण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असेल.
  • अकरावी, बारावी अभ्यासक्रमाच्या रचनेत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करावा लागणार आहे. त्याचबरोबर त्याप्रमाणे शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे लागणार, त्यासाठी कालावधी लागेल.
  • परीक्षा पद्धतीचा आराखडा तयार करून त्यासंदर्भात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे अभिप्राय घ्यावे लागतील. त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
  • राज्यातील शिक्षण पद्धतीत कशा पद्धतीने बदल केले जातील, बोर्ड संरचना बदलावी लागणे, यासाठी वेळ द्यावा लागणार.

सध्याची पद्धत काय?

सध्याच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या द़ृष्टीने गुण मिळविण्यासाठी शाखेचा पर्याय व आवड याला महत्त्व देत तीन पैकी एका शाखेला प्रवेश घेतात. यामध्ये दहावीत अंतिम वर्षाचा तसेच बारावीच्या विविध शाखांच्या अंतिम परीक्षेतील गुणांवर आधारित पुढील वर्गाचे प्रवेश यंत्रणा राबविली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची स्पर्धा होते आणि प्रवेशाची चुरस होते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण राहतो. शाखांतून विद्यार्थ्यांना केवळ मर्यादित शाखेचे अभ्यासक्रम शिकण्याची मुभा असल्याने विद्यार्थ्यांवर त्या शिक्षणाव्यतिरिक्त पर्याय उभा राहात नाही.

Back to top button