Maharashtra Budget 2023 : ‘पंचामृता’च्या धसक्याने विरोधक गपगार! | पुढारी

Maharashtra Budget 2023 : 'पंचामृता'च्या धसक्याने विरोधक गपगार!

विधान भवनातून -उदय तानपाठक
अहवाल बुधवारी सादर झाला, तेव्हाच आजचा अर्थसंकल्प कसा असेल याचा अंदाज आला होता. झालेही तसेच.. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी अनेक मोठ्या मोठ्या विधान भवनातून पोषणांसोबतच विविध जातीच्या विकासासाठी महामंडळे आणि अन्य सवलतींचा पाऊस अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संयुक्त सरकार आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याबद्दल उत्सुकता होती. त्यात अर्थमंत्री फडणवीस यांनी थेट जनतेतून या बजेटमध्ये काय असावे, यासाठी सूचना मागवल्या होत्या. अशाप्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला.

Maharashtra Budget 2023 : निवडक सूचनांचा समावेश

अक्षरश: हजारो सूचना आणि अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यापैकी निवडक सूचनांचा समावेश या अर्थसंकल्पात केला गेल्याचे अर्थमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले. एकेक घोषणा फडणवीस करत होते तेव्हा विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. विशेषतः, शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना जाहीर झाली, तेव्हाच आपल्यावर कुरघोडी होणार याची खात्रीच विरोधकांना, खासकरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना पटली.. अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर बाहेर विरोधक त्यांच्या पद्धतीने सरकारविरोधी जाहीर प्रतिक्रिया देत असले, तरी खासगीत मात्र या अर्थसंकल्पामुळे आमची अडचणच होणार असल्याचे सांगत होते.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास ‘पंचामृत’ अर्थसंकल्प सादर केला आहे. या पंचामृता’तील नेमके कोणकोणते अमृत जनतेच्या मुखात पडेल आणि त्याचा काय परिणाम होईल, हे पाहावे लागेल! अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाहेर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांची रीघ लागली होती! कुणाकुणाला लाईव्ह घ्यावे, असा प्रश्न मीडियाकर्मींना पडला होता.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही विधानभवनात आले होते. दीपक केसरकर हे अर्थसंकल्प मांडत असताना उद्धव ठाकरे समोर बसून होते. त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर गॅलरीत बसून भाषण ऐकत होते. यावेळच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे वैशिष्ट्य असे दोन्ही सभागृहांत सरकारकडून मंत्री भाषण करीत असताना विरोधक अत्यंत शांतपणे ऐकत होते. एरव्ही अर्थसंकल्प मांडला जात असताना विरोधकांकडून प्रचंड घोषणाबाजी सुरू असते, त्याला सत्ताधारी आमदारांकडून प्रत्युत्तर दिले जाते. आज मात्र विरोधकांनी अत्यंत शांतपणे भाषण ऐकून घेतले. विरोधकांच्या या शांततेची चर्चा बाहेर रंगली सेती.

विरोधकांकडून सभागृहात शांतता पाळली गेली; मात्र बाहेर महाविकास आघाडीच्या गोटात काही तरी शिजत असल्याचे चित्र होते. उद्धव ठाकरे यांनी काल अजित पवारांच्या दालनात आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. आज ते विधानभवनातून बाहेर पडले आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बंगल्यावर पोहोचले. आघाडीचे नेतेही पाठोपाठ दानवेंच्या बंगल्यावर गेले. या बैठकीत एप्रिल-मे महिन्यात राज्यभर शिंदे- फडणवीस सरकारविरोधात धुरळा उडवून देण्यासाठी योजना आखली गेली, असे म्हणतात. महापालिकांच्या निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत.

कसबा आणि नागपुरातील विजयांमुळे महाविकास आघाडीत उत्साह निर्माण झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकांतही अशीच एकी कायम ठेवली, तर तिथेही भाजप-शिवसेनेवर मात करता येईल, असे आघाडीतील काही नेत्यांना वाटते. मात्र, ही एकी जागावाटपापर्यंत टिकेल काय? असा सवाल त्यांच्यापैकीच काही नेते खासगीत विचारत आहेत. आगामी राज्यव्यापी मेळाव्यांद्वारे वातावरणनिर्मिती करण्याचे डावपेच सध्या आखले जात असले, तरी या सरकारविरोधातील खटल्याचा निकाल येत्या ११ मार्चला लागण्याची शक्यता आहे. या निकालावर सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सबुरीने घेत असावेत, असे दिसते.

Back to top button