थंडीत दम्याच्या रुग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळावे | पुढारी

थंडीत दम्याच्या रुग्णांनी 'या' पदार्थांचे सेवन टाळावे

मुंबई :  पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली इत्यादी उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट आली आहे. तापमान एकच्या आसपास गेले आहे. याचाच परिणाम दरवर्षीपेक्षाही थंडीचा कडाका महाराष्ट्र, गोवा इत्यादी राज्यांत वाढला आहे.

काहींना हिवाळा ऋतू हा आल्हाददायक वाटतो. अर्थात, हे खरेही आहे; पण हिवाळा येतो तेव्हा अनेक आजारही घेऊन येतो. त्यामुळे या ऋतूत लोकांनी अधिक काळजी घेण्याचीही गरज असते. काहींची सांधेदुखी चाळवते तर काहींना पोटाचा त्रास सुरू होतो. या सर्वात जास्त काळजी घ्यावी ती दम्याच्या रुग्णांनी.

दमेकऱ्यांनी या थंडीच्या दिवसांत आईस्क्रीमसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळणेच बरे. इतकेच कशाला थंड पाणी पिणेही टाळणेच हितावह असते. याशिवाय लिंबू, दही, लोणचे अशा थंड पदार्थांपासून जरा लांबच राहावे.

थंडी असली की, चहाची तलफ येणे साहजिकच असते; पण हा चहासुद्धा घातकी असतो बरे का? आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की, अस्थमाच्या रुग्णांनी फास्टफूडपासून जेवढे लांब राहता येईल तेवढे राहावे. कारण, जवळपास ३५ ते ४० टक्के रुग्णांना फास्टफूडचा धोका असतो. तसेच वायू प्रदूषणामुळे दम्याचा त्रास वाढतो ही गोष्टही खरी आहे.

थोडक्यात काय, तर दम्याला दमाने घ्यायचे असल्यास हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे जेवढे टाळता येतील तेवढे चांगलेच; मग काय हा साधा, सोपा; पण परिणामकारक आरोग्य मंत्र अंगीकारणार ना?

Back to top button