मनपा स्वीकृत सदस्यसंख्या आता दहा : मंत्रिमंडळाचा निर्णय | पुढारी

मनपा स्वीकृत सदस्यसंख्या आता दहा : मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक बदल करण्याच्या द़ृष्टीने नामनिर्देशित सदस्यांची संख्या दुपटीने वाढविण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी जास्तीत जास्त पाच नामनिर्देशित सदस्य घेता येत होते. त्यांची संख्या आता दहा करण्यात आली आहे. त्यामुळे निवडून न येणार्‍या विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना महापालिका सभागृहात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नामनिर्देशित सदस्य वाढविण्याच्या द़ृष्टीने महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याचा तत्त्वत: निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तसेच याबाबत राज्याचे महाधिवक्ता यांचे अभिप्राय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सध्या महानगरपालिकांतील नामनिर्देशित सदस्यांची संख्या पाच इतकी आहे. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या, शासनाने केलेल्या नियमांनुसार विहित अर्हता धारण करणार्‍या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करता येते.
याच उद्देशाने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत आणखी वाढ करण्याची आवश्यकता होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही संख्या दुपटीने वाढविण्यात आली आहे.

Back to top button