रुपाली चाकणकरांचा दरेकरांना गर्भित इशारा : तर गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतो! - पुढारी

रुपाली चाकणकरांचा दरेकरांना गर्भित इशारा : तर गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतो!

पुणे; पुढारी ऑनलाईन : रुपाली चाकणकरांचा दरेकरांना गर्भित इशारा : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याचे वक्तव्य केल्यानंतर रणकंदन माजले आहे.

त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांनी गंभीर दखल घेत प्रवीण दरेकरांना इशारा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियात व्हिडिओ जारी करून प्रतिक्रिया दिली आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, आपल्या वक्तव्यातून असे दिसते की, आपला आणि अभ्यासाचा दुरान्वये संबंध दिसत नाही. आपण जे वाक्य उच्चारला ते मला बोलण्यासही लाज वाटते. आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली.

रुपाली चाकणकरांचा दरेकरांना गर्भित इशारा

त्यांनी पुढे म्हटले आहे की आपल्या पक्षातील काही महिला अशा आहेत ज्या महिलांच्या कैवारी असल्याचे आव आणतात. आज त्यांची मला त्यांची कीव वाटते, त्या अशा पक्षात काम करतात जिथं हा विचार आहे. त्यामुळे पक्षाची संस्कृती दिसून येते. केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते.

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर?

पुण्यामध्ये बोलताना प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर शेलक्या शब्दात टीका केली होती. सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत त्यांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याची टीका केली होती.

या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली होती.

हे ही वाचलं का?

Back to top button