आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले राज्यात स्वतंत्र औषधे खरेदी महामंडळ स्थापणार | पुढारी

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले राज्यात स्वतंत्र औषधे खरेदी महामंडळ स्थापणार

मुंबई ; अजय गोरड : औषधे, वैद्यकीय उपकरणे व साहित्य खरेदीतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात स्वंतत्र औषधे खरेदी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ’पुढारी’शी बोलताना दिली.

औषध खरेदीचा तामिळनाडू पॅटर्न अभ्यासण्यासाठी राजेश टोपे सध्या तामिळनाडू दौर्‍यावर असून, त्यांनी तेथील महामंडळाकडून कशा पद्धतीने औषधे खरेदी केली जातात याची प्रक्रिया व माहिती सोमवारी समजून घेतली. औषध खरेदी महामंडळाचे स्वरुप ठरविण्यासाठी सनदी अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल आणि डिसेंबरमध्ये होणार्‍या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा कायदा मंजूर केला जाईल, असे टोपे म्हणाले.

राज्य शासनाचे विविध विभाग आपापल्या गरजेनुसार औषधे, वैद्यकीय उपकरणे, सामग्री खरेदी करतात. मात्र, त्यासाठी कोणतेही धोरण नाही अथवा एकसूत्रीपणा नाही. एकाच प्रकारचे औषध दोन विभाग वेगवेगळ्या किंमतीत खरेदी करतात. परिणामी, गैरव्यवहार व भ्रष्टाचाराला वाव मिळतो. हे टाळण्यासाठी तामिळनाडूतील महामंडळाचा कारभार कसा चालतो हे समजून घेतले, असे टोपे म्हणाले.

औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये फडणवीस सरकारने आणला होता. मात्र, त्यावेळी पुढे काहीच घडले नाही.

राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच स्वतंत्र औषधे खरेदी महामंडळ स्थापन केले जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री टोपे यांनी केली होती. मात्र, कोरोनामुळे ते मागील दीड वर्षापासून शक्य झाले नाही.

कोरोनाची दुसरी लाट ओसरताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकार्‍यांसह तामिळनाडू दौरा करून महामंडळ स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने पावले टाकली आहेत.

Back to top button