मुंबई; पुढारी ऑनलाईन : MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ची तारीख जाहीर जाहीर करण्यात आली आहे. येत्या चार डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. याबाबत आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
आयोगाने परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे, अशी माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
या मुख्य परीक्षेसोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या १८ डिसेंबर रोजी केले जाईल. मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची आयोगाकडे विद्यार्थी मागणी करत होते. दरम्यान, आयोगाने या तारख्या जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून, मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.