दारु विकणाऱ्या काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेंड, परंतु मला एकही मुलगी पटत नाही! थेट आमदाराला 'लेटर' | पुढारी

दारु विकणाऱ्या काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेंड, परंतु मला एकही मुलगी पटत नाही! थेट आमदाराला 'लेटर'

चंद्रपूर ; पुढारी वृत्‍तसेवा : मुलगी किंवा आपल्याला आवडणारी एखादी मुलगी भाव देत नाही म्हणून आतापर्यंत अनेक मुलं एखाद्या अनुभवी माणसाचा किंवा लव्ह गुरुचा सल्ला घेताना आपण पाहिली असतील. परंतू चंद्रपुरातील राजूरा येथील एका अतिउत्साही तरुणाने तर हद्दच पार केली आहे. गर्लफ्रेंड पटत नसल्‍याने आमदारांना लेटर लिहिले आहे.

राजुऱ्याचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहून आपली प्रेयसी नसण्याबाबत व्यथा मांडली आहे. गर्लफ्रेंड पटत नसल्‍याने आमदारांना लेटर लिहिल्‍याची चर्चा चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे.

सदर युवक येवढ्यावरच थांबला नाही, तर सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून या प्रकाराची भरभरून प्रसिद्ध मिळवून घेतली आहे. मात्र हा प्रकार आमदार महोदयांना अजिबात आवडलेला नाही.

याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतिउत्साही कार्यकर्त्याने मला लिहिलेले आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला पत्र व्यवहार हा योग्य नव्हे. त्याचे म्हणणे एकूण घेवून त्याला समजवता येईल असे सांगून त्याला शोधण्याचे आदेश दिले आहेत.

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, मला एकही पटेना. माझा जीव जळून जातो अशा आशयाचा आर्त मजकूर या पत्रात लिहीले आहे. परंतू हे पत्र आमदार धोटे यांना अद्याप मिळालेलं नसल्याचं कळतंय. तसंच हे पत्र लिहीणारा तरुण नेमका कोण आहे आणि कुठे राहतो, काय करतो याबद्दलही नेमकी माहिती कळू शकलेली नाही.

जाणून घ्या काय म्‍हटल आहे या पत्रात?

प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा

विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्याबाबत

अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड

महोदय,

सविनय विनंती या प्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज फे-या मारतो, परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा.

आपला प्रेमी

भूषण जांबुवंत राठोड

अशा आशयाचे पत्र चक्क आमदारालाच लिहिल्याने या प्रकाराला सोशल मीडियावर आणि प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळालेली आहे.

दरम्यान हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेलं असलं तरीही ते आपल्‍यापर्यंत पोहचलेलं नसल्याचं काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी सांगितलं. आपल्या कार्यकर्त्यांना या युवकाला शोधण्याचे आदेश धोटे यांनी दिले आहेत. हा तरुण सापडला तर त्याची विचारपूस करुन योग्य ते मार्गदर्शन करुन समजूत काढली जाईल परंतू अशा पद्धतीने पत्र लिहीणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Back to top button